अहिल्यानगर-स्वस्तिक बसस्थानकामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकास मारहाण झाल्याची घटना घडली. बस उभी करताना इशारा देणार्या वाहकास शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशा घुले (वय 40, रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. किसन धनवटे (मुळ रा. देहरे, ता. अहिल्यानगर; हल्ली रा. सावेडीगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी (1 मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास बसस्थानकामध्ये ही घटना घडली. चालक बस उभी करत असताना, महिला वाहक घुले या खाली उतरून त्यांना इशारा देत होत्या. यावेळी तिथे आलेल्या धनवटे याने बस बाबत विचारणा केली. घुले यांनी काही क्षण थांबण्यास सांगितले असता, त्याला राग अनावर झाला.धनवटे याने महिला वाहक घुले यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही तर, त्याने शर्ट पकडून मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. उपस्थित सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून मारहाण करणार्या धनवटे याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी किसन धनवटे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


