अहिल्यानगर-पत्नी आणि सासर्याचा खून करून जामिनावर बाहेर आलेल्या तरूणाने अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात बिरोबा मंदिराजवळ शनिवारी सकाळी घडली. गार्गी गणेश शिंदे (वय 15 रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे जखमी मुलीचे नाव आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यासंदर्भात सचिन नागनाथ पोटे (वय 33, रा. बिरोबा मंदिर, भिस्तबाग, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश माणिक भेटे (रा. भिस्तबाग, सावेडी) याच्याविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोटे हे गणेश नानासाहेब भोजने यांच्या भाडोत्री खोलीत एकटे राहत होते. त्याच इमारतीत इतरही भाडेकरू राहत असून, त्यात महेश माणिक भेटे हा देखील एकटा राहत होता. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पोटे हे आपल्या खोलीत असताना शेजारील खोलीतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे ते बाहेर आले असता, काही लोक भेटेच्या खोलीच्या खिडकीतून डोकावत होते व मारले, मारले असा गोंधळ करत होते. पोटे यांनीही खिडकीतून पाहिले असता, महेश भेटे हा एका मुलीच्या अंगावर बसलेला असून त्याच्या हातात चाकू होता. त्याने त्या चाकूने थेट मुलीच्या गळ्यावर वार केला. पोटे यांनी तात्काळ घरमालक गणेश भोजने यांना फोन करून घटनेची माहिती दिली व मदतीला बोलावले. त्यानंतर त्यांनी भेटेच्या खोलीचा दरवाजा लाथ मारून उघडला.
दरम्यान गंभीर जखमी झालेली मुलगी थेट बाहेर पळाली. तिच्या गळ्यावर खोल जखम झाल्यामुळे रक्त वाहत होते व कपडे रक्ताने माखलेले होते. जखमेमुळे तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता, मात्र ती रस्त्याकडे धावत सुटली. त्यानंतर महेश भेटे हा देखील चाकू हातात घेऊन बाहेर आला व ती मुलगी ज्या दिशेने पळाली त्याच्याकडे निघाला. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेली मुलगी गार्गी शिंदे असून ती भेटेसोबत दुचाकीवरून त्या ठिकाणी आली होती. कोणत्या कारणावरून वाद झाला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र भेटेने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेश माणिक भेटे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करीत आहेत.
महेश भेटे याने कौटुंबिक वादातून ऑक्टोबर 2022 मध्ये पत्नी व सासर्याचा खून केला होता. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याने पुन्हा अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ला करून तो पसार झाला असून तोफखाना पोलीस त्याचा शोध घेत आहे.


