उसने पैसे मागितल्याने कुटुंबावर अमानुष मारहाण.
आरोपींच्या अटकेसाठी एकलव्य संघटनेचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर अमानुष मारहाण करत विनयभंग व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
रुक्मिणी प्रकाश गायकवाड (रा. सलाबतपूर, ता. नेवासा) यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी उसने पैसे दिले होते. हे पैसे परत मागितल्यावर विकास लक्ष्मण चरभरे, सतीश लक्ष्मण चरभरे, अशपाक अल्लाबक्ष शेख, सोनाबाई लक्ष्मण चरभरे व अनिता अशपाक शेख यांनी गायकवाड कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यावेळी रुक्मिणी गायकवाड यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
आरोपी हे दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत असून, सलाबतपूर येथील जनावरांच्या दवाखान्याजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पीडित कुटुंब भिल्ल आदिवासी समाजातील असून, गुन्हा दाखल केल्यानंतरही आरोपी घरी येऊन दहशत माजवत संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत गायकवाड कुटुंबीयांसह धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
Ahilyanagar crime :उसने पैसे मागितल्याने कुटुंबावर अमानुष मारहाण……
- Advertisement -


