नगर – दोन वर्षापुर्वी शिर्डी परिसरामध्ये झालेल्या अनोळखी महिलेच्या खूनाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पथकाने या घटनेतील आरोपीला ताब्यात घेतले आहे.आकाश मोहन कपिले (वय 28 वर्षे, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नावं आहे.
 याबाबत हकिगत अशी की, दिनांक 19/03/2024 रोजी सावळीविहीर बु, ता. राहाता येथील के. के. मिल्क जवळील दगडाच्या खाणीमध्ये एक 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आलेला होता. सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये रजि. नंबर 32/2023 सी. आर.पी.सी. 174 प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली होती. सदर अकस्मात मृत्युच्या तपासामध्ये यातील मयत महिला हिचा गळा आवळुन खून झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने सपोनि पप्पु यासीन कादरी नेम – शिर्डी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 287/2024 भादवि कलम 302, 201 प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली ना उघड खूनाचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, ह्रदय घोडके, लक्ष्मण खोकले, दिपक घाटकर, रमीझराजा आतार, सुनिल मालणकर, भगवान धुळे यांना नेमण्यात आलेले आहे.
सदर पथक हे अहिल्यानगर जिल्ह्यातील ना उघड खूनाचे गुन्ह्याची माहिती संकलित करुन आरोपींची माहिती काढत असताना आकाश मोहन कपिले रा. शिर्डी, ता. राहाता याने 2 वर्षापुर्वी एका महिलेस के. के. मिल्क जवळील दगडाच्या खाणीजवळ नेवुन ठार मारुन तिचा मृतदेह खाणीमध्ये टाकलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे आकाश मोहन कपिले (वय 28 वर्षे, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर ) यास शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले . त्याची चौकशी केली असता त्याचा मानलेला मामा संदिप रावसाहेब झावरे रा. शिर्डी ता. राहाता याने शिर्डी बस स्टॅन्ड येथे बाहेरील राज्यातील बस बुकींगचे करारपत्र केलेले होते. त्यावेळी तो त्याच्या मामा सोबत शिर्डी बस स्टॅन्ड येथे प्रवाशी बुकींगचे काम करत होता. शिर्डी बस स्टॅन्ड येथे भिक्षा मागणारी अनोळखी मयत महिला हि त्यास ”तु माझा नवरा आहे” असे वेळोवेळी बोलत होती. त्यावरुन बस स्टॅन्डवरील इतर लोकही त्यास सदर बाबत चिडवत होते. सदर कारणाचा राग मनात धरुन त्याने त्याच्या वाढदिवशी दिनांक 17/03/2023 रोजी त्याच्याकडील होडा कंपनीची डिओ मोपेड गाडी क्रमांक MH17BW6950 वरुन शिर्डी बसस्टँडवर भिक्षा मागणारी मयत महिला हिस शिर्डी बसस्टँड येथुन सावळीविहीर गावच्या शिवारातील के.के. मिल्क जवळील दगडाच्या खाणीजवळ नेवुन तिचा गळा आवळुन खून केल्याचे व तिचे प्रेत खाणीमध्ये टाकले असल्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मागील दोन वर्षापुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये कोणताही धागादोरा नसतांना कौशल्य पणाला लावुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. ताब्यातील आरोपीस शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 287/2024 भादवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.


