अहिल्यानगर-‘माझ्याकडे का पाहतोस’ असे म्हणत एका युवकाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना शनिवारी (27 सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या बालिकाश्रम रस्त्यावर घडली. ओम विश्वास शिरसाठ (वय 18, रा. पोलीस हेडक्वॉटर, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) असे जखमी युवकाचे नाव आहे.दरम्यान, त्याने दिलेल्या फिर्यादीवरून लकी बोरूडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम शिरसाठ याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो बालिकाश्रम रस्त्यावरील शिव स्पोर्ट दुकानासमोर उभा असताना त्याचा ओळखीचा लकी बोरूडे हा त्याच्या दोन मित्रांसह तेथे आला. ‘माझ्याकडे का बघतोस’ असे म्हणून लकीने ओमशी वाद घालण्यास सुरूवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
लकीने पॅन्टच्या खिशातून एक टणक वस्तू काढून ओमच्या डोक्यात मारली, ज्यामुळे तो जखमी झाला. यानंतर लकी व त्याच्या दोन्ही साथीदारांनी ओमला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि ‘आज वाचलास, पण नंतर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. घटनेनंतर जखमी ओम शिरसाठ याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंतर त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


