घरातून पावणेसात लाखांचे दागिने लंपास!
अहिल्यानगर-शहरातील दसऱ्याच्या दिवशी रावणदहन पाहण्यासाठी घराबाहेर पडणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. शहरातील वाकोडी रोडवरील डॉक्टर कॉलनी परिसरात राहणारे व्यावसायिक राहुल सुनील ससाणे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख ९० हजार ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राहुल ससाणे (वय ३१) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ससाणे कुटुंब गुरुवारी, दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास दसऱ्यानिमित्त मार्केट यार्ड येथे आयोजित रावणदहन कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या सेफ्टी डोअरचा कोयंडा आणि मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे राणी हार, कानातील वेल, झुमके, सोन्याच्या बाळ्या, अंगठ्या, नथ आणि चांदीचे जोडवे-कडे असा एकूण पावणेसात लाखांचा ऐवज लंपास केला. रात्री दहा वाजता कुटुंब घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कोतवाली पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
Ahilyanagar crime news:दसऱ्याच्या दिवशी घरातून पावणेसात लाखांचे दागिने लंपास
- Advertisement -


