नगर: लग्न करण्याचे आमिष दाखवत एका ४२ वर्षीय शिक्षिकेची तब्बल २२ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून अक्षय रामदास काळे, त्याची आई सविता काळे व बहीण सुप्रिया काळे (सर्व रा. काळेवाडी, ता. पारनेर) यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित शिक्षिकेची ओळख २०१९ साली एका चहाच्या दुकानात मॅनेजर असलेल्या अक्षय काळे याच्याशी झाली. ओळख प्रेमात बदलली आणि काळे याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी शिक्षिकेकडून आर्थिक मदतीच्या नावाखाली पैसे उकळण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला रोख रक्कम व दागिन्यांच्या स्वरूपात पैसे घेतल्यानंतर, सावेडीतील संबंधित चहाची शाखा विकत घेण्यासाठी तिला २० लाखांचे कर्ज काढण्यास भाग पाडले. ही रक्कम काळे याच्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली. या पैशांचा वापर करून आरोपींनी सोन्याचे दागिने, नवीन दुचाकी खरेदी केली.
यानंतर काही काळातच अक्षय काळे याने ती चहाची शाखा परस्पर विकली व शिक्षिकेशी लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या फसवणुकीमुळे घेतलेल्या कर्जाचे हप्ते आजही तिच्या पगारातून वसूल होत असल्याचे शिक्षिकेने फिर्यादीत म्हटले आहे.


