Saturday, February 21, 2026

अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गणांची स़ंख्या वाढली

अहिल्यानगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गण रचनेचा कार्यक्रम व वेळापत्रक राज्य सरकारने जाहीर केले आहे. गेल्यावेळीच्या तुलनेत जिल्ह्यात २ गट व ४ जणांची वाढ करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे एकूण ७५ गट व पंचायत समितीचे एकूण १५० गण तयार होणार आहेत. प्रारूप रचना १४ जुलैला तर अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्टपर्यंत तयार केली जाणार आहे.

सन २०११ च्या लोकसंख्येनुसार गट-गण रचना तयार केली जाईल. त्यावेळी जनगणना (ग्रामीण) ३६ लाख ४ हजार ६६८ होती तर ‘एससी’ची लोकसंख्या ४ लाख ४६ हजार ४६४ व ‘एसटी’ची ३ लाख ५७ हजार ४५२ होती. त्यानुसार आता जि. प. चे ७५ गट व पंचायत समितीचे १५० गण तयार होणार आहेत. नगर जिल्ह्याची गट-गणांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. यापूर्वी सन २०१७ च्या निवडणुकीची वेळी गटांची संख्या ७३ तर गणांची संख्या १४६ होती.

गट-गण रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सन २०१७ ची प्रभाग रचना विचारात घेऊन ही कार्यवाही करायची आहे. गण रचनेची सुरुवात जिल्ह्याच्या उत्तर दिशेकडून ईशान्यकडे नंतर पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे सरकत शेवट दक्षिणेत करायचा आहे (झिगझॅग पद्धत). यामध्ये भौगोलिक सलगता राहील याची काळजी घ्यायची आहे. गणाच्या सीमारेषा मोठे रस्ते, कल्याणाच्या गल्ली, नदी, नाली डोंगर, रस्ते, फ्लाय ओव्हर विचारात घेऊन सीमा निश्चित करायची आहे. ग्रामपंचायतीचे विभाजन करता येणार नाही. गट-गणाची सरासरी लोकसंख्या (१० टक्के कमाल-किमान मर्यादेचे पालन करावे), गट-गण रचनेचे प्रारूप जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती तयार करेल. त्यामध्ये जिल्हाधिकारी नियुक्त करतील, असा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित असलेले तहसीलदार, संगणक तज्ज्ञ व आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
वेळापत्रक

१४ जुलैला जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करतील.

२१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करता येतील.

२८ जुलैला प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करतील.

११ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्त प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निर्णय घेतील.

१८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी अधिकृत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करतील.

तालुकानिहाय गट-गणाची संख्या (कंसात गणांची संख्या) अकोले- ६ (१२), संगमनेर- ९ (१८), कोपरगाव- ५ (१०), राहाता- ५ (१०), श्रीरामपूर- ४(८), नेवासा- ७ (१४), शेवगाव- ४ (८), पाथर्डी-५ (१०), नगर- ६ (१२), राहुरी- ५ (१०), श्रीगोंदे- ६ (१२), कर्जत- ५ (१०) व जामखेड- ३ (६). कर्जत व जामखेडमध्ये प्रत्येकी १ गट वाढला आहे.
मतदार संख्येत वाढ

सन २०१७ च्या निवडणुकीवेळी गटाची लोकसंख्या सुमारे ५० हजारापर्यंत व गणाची लोकसंख्या सुमारे २५ हजारापर्यंत (१० टक्के कमीअधिक) होती. आता लोकसंख्येत पर्यायाने मतदार संख्येतही वाढ झालेली असल्याने गटगण अधिक विस्ताराचे असतील, असा अंदाज वर्तवला जातो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles