Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयाकडून दिव्यांगांच्या तपासणीला नकार; डॉक्टरांचा निर्णय

अहिल्यानगर- जिल्हा शासकीय रूग्णालयात दर बुधवारी होणारी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया बुधवारी अचानक ठप्प झाल्याने जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांचे मोठे हाल झाले. दिव्यांग बोर्डावरील डॉक्टरांनी एका सामाजिक संस्थेकडून होत असलेल्या कथित बदनामीचा निषेध करत तपासणी व प्रमाणपत्र वितरणाचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या हस्तक्षेपानंतर केवळ 100 टक्के दिव्यांग असलेल्या रूग्णांची तपासणी करण्यात आली, तर इतरांना तपासणीविना माघारी जावे लागले.

जिल्हा शासकीय रूग्णालयात दिव्यांग तपासणीसाठी अधिकृत बोर्ड कार्यरत आहे. या बोर्डामार्फत दर बुधवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून येणार्‍या दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यावश्यक असल्याने दर आठवड्याला मोठ्या संख्येने दिव्यांग व त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती असते. अनेकांना येण्या-जाण्याचा खर्च, प्रवासाची गैरसोय आणि सोबत एका व्यक्तीची गरज भासते. मात्र बुधवारी सकाळी रूग्णालयात पोहोचलेल्या दिव्यांगांना तपासणी प्रक्रिया बंद असल्याचे समजताच नाराजीचा सूर उमटला. काहींनी लांबच्या तालुक्यांतून प्रवास करून आले असल्याचे सांगितले.दरम्यान, दिव्यांग बोर्डावरील सर्व डॉक्टरांनी सोमवारी (9 फेब्रुवारी) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे यांना पत्र देत, गेल्या एक वर्षापासून एका सामाजिक संस्थेकडून सातत्याने बदनामी होत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर आम्ही दिव्यांग बोर्डावर काम करणार नाही, असा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपासणीसाठी अधिकृत अधिकार बोर्डावरील डॉक्टरांकडेच असल्याने व पर्यायी यंत्रणा नसल्यामुळे डॉ. घोगरे यांनी डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दिव्यांगांचे हाल लक्षात घेऊन त्यांनी कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली.

त्यानंतर केवळ 100 टक्के दिव्यांग असलेल्या रूग्णांची तपासणी करण्यात आली; मात्र इतर दिव्यांगांना प्रमाणपत्र न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागले. दरम्यान, पुढील बुधवारी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण नियमितपणे होणार की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे. प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून सेवा सुरळीत करण्याची मागणी दिव्यांग बांधवांकडून होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles