अहिल्यानगर-शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरूर तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर श्रीगोंद्यातील तिच्याच शाळेतील गणित विषयाच्या शिक्षकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनी श्रीगोंद्यातील एका महाविद्यालयात डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.त्याच महाविद्यालयातील गणित विषयाचा शिक्षक शिवाजी नवले (वय २९, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा) याने जानेवारी २०२५ पासून १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीने पीडितेला श्रीगोंदा येथील हॉटेलमध्ये, तसेच महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात आणि इतर ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दाखल अंमलदार नितीन घाडगे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.


