दादागिरी-दहशतीला थारा नाही, सहनशीलतेची मर्यादा ओलांडली तर गाठ माझ्याशी -खासदार निलेश लंके
नगर- नगरकरांना छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे. ज्यांनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. गुजरातचे जातीभेद करणारे हिंदुत्व मान्य नाही. हिंदुत्व निलेश लंकेच्या रक्तात आहे, राजकीय पोळी भाजण्यासाठीचे ते हिंदुत्व नव्हे. राजकारण सहनशीलतेने करत आहोत, दादागिरी-दहशत केली तर माझ्याशी गाठ असल्याचा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला.
प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. याच सभेत महाविकास आघाडीचा ‘निश्चयनामा 2026’ जाहीर करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख किरण काळे, प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, निलेश मालपाणी, प्रा. सिताराम काकडे, नामदेव पवार, गोविंद मोकाटे, संजय झिंजे, आरिफ शेख, मनोज गुंदेचा, गिरीश जाधव, अभिजीत ससाणे, बाळासाहेब भंडारी, फारुक रंगरेज आदींसह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार लंके म्हणाले की, महाविकास आघाडी राजकारण सहनशीलतेने करत आहे. मात्र दादागिरी, धमकी व दहशतीचा प्रयत्न झाला, तर माझ्याशी गाठ आहे, हे स्पष्टपणे सांगतो. आघाडीतील नेत्यांवर दडपशाही करणे, व्यवसायावर कारवाई करणे, खोटे गुन्हे दाखल करणे व वैयक्तिक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. आम्हाला हात जोडताही येतात आणि वेळप्रसंगी भायापणही वर करता येते. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी आमच्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. गुन्हे आणि जेल उकळून प्यालो आहोत, त्यामुळे कार्यकर्ते व उमेदवारांवर गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, निश्चयनामा 2026 मध्ये शहरातील लाडक्या बहिणींच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेवर 50 टक्के सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली. महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर नागरिकांना सन्मानाने वागवतील, त्यांची कामे करतील. काही चूक झाली तर नागरिकांना कान पकडायला लावता येतील, असे जबाबदार नगरसेवक महाविकास आघाडीकडे असतील, असे त्यांनी सांगितले.
सिस्पे पे घोटाळ्याबाबत बोलताना खासदार लंके म्हणाले की, या घोटाळ्यात गोरगरीब जनतेचे पैसे अडकले आहेत. आठ महिन्यांपूर्वीच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे निवेदन देऊन केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना अचानक जाग आली आहे. सिस्पे कार्यालयाच्या उद्घाटनाला लोकप्रतिनिधी म्हणून गेलो, पण त्यातून घोटाळा झाला म्हणून जबाबदारी आमच्यावर ढकलणे चुकीचे आहे. तुम्हीही अनेक पतसंस्थांच्या उद्घाटनाला जाता, तेथे घोटाळे झाले तर तुम्ही जबाबदार ठरता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुसऱ्यांच्या ताटातले ओढून खाणे ही आमची संस्कृती नाही. आम्ही गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी राजकारण करतो, संपत्ती व संस्था टिकवण्यासाठी नाही. 2024 च्या धक्क्यातून त्यांनी बाहेर पडावे. निलेश लंकेशी वैर परवडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
फेज-2 योजना तब्बल 16 वर्षांनंतरही पूर्ण कार्यान्वित होत नसताना विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत. दहशत व दादागिरी करून काही काळ राज्य करता येईल, पण लोकांच्या हृदयावर राज्य करण्याचे काम महाविकास आघाडी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात भाजपची ‘बी टीम’ म्हणून ओळखली जाणारी एमआयएम शहरात आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांनीच केले असून, काही ठिकाणी भाजपने चक्क एमआयएमसोबत युती केल्याचा आरोपही त्यांनी केला.
सभेच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीत उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी व्हिडिओद्वारे निश्चयनामा 2026 सादर करण्यात आला.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण म्हणाले की, 2003 मध्ये महापालिका स्थापन होऊन 23 वर्षे झाली, तरीही सत्ताधाऱ्यांना शहराचा सर्वांगीण विकास साधता आला नाही. महाविकास आघाडीने जनतेसाठी काय करणार, याचे स्पष्ट दर्शन निश्चयनाम्यातून घडते. सत्ताधाऱ्यांनी निवडणुका बिनविरोध करण्याचा ट्रेंड निर्माण केला. नगरसेवक निवडून आणण्याचे ठेके दिले असते, तर निवडणुकांची गरजच उरली नसती, असा टोला त्यांनी लगावला. मोकाट कुत्रे, नाट्य संकुल व कचरा डेपोच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.
शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना डांबर व खडी कोणी खाल्ली, असा सवाल केला. सावेडीतील नाट्य संकुलाचा परिसर दारू व जुगाराचा अड्डा बनल्याची टीका त्यांनी केली. रस्त्याच्या कामात 300 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झाल्याबाबत चौकशीची मागणी केल्याचे त्यांना झोफ्लबले. खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करुन ताबेमारी करण्यात आली. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास अतिक्रमित भूखंड मोकळे करून उद्याने उभारली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की, हुकूमशाही पद्धतीने राजकारण संपूर्ण देशात सुरु आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे, मात्र हा बदल शहरात झालेला नाही. गुन्हेगारी, दहशतशाही वाढली असून, हे वातावरण बदलण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्या लोकप्रतिनिधीत अचानक हिंदुत्व घुसले कुठून? लोकांना त्या अजेंड्याची चीड निर्माण झाली आहे. दबलेला जनतेचा आवाज निस्टून काढले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिजीत ससाणे यांनी सांगितले की, गोरगरिबांचे खरे प्रतिनिधित्व खासदार निलेश लंके करतात. कोरोनाच्या काळात सर्वांना आधार देणारा, जनतेच्या प्रश्नांसाठी धावून जाणारा हा नेता आहे. सत्ताधाऱ्यांनी लंके विरुद्ध निवडणूक असे चित्र उभे केले असून, जनता त्याला योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले.


