Tuesday, November 4, 2025

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक अहिल्यानगर मधील नोकरदाराची तीन कोटीची फसवणूक

अहिल्यानगर -भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून, संवाद गट आणि बनावट भ्रमणध्वनी प्रणालीच्या जाळ्यात अडकवून, राहुरी कृषी विद्यापीठातील एका ६१ वर्षीय प्राध्यापकाला तब्बल ३ कोटी ३ लाख १५ हजार रुपयांना लुटल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी प्राध्यापक विरेंद्र नारायण बारई (वय ६१, रा. प्रणवकुंज, रासनेनगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, तोफखाना पोलीस ठाण्यात साक्षी गुप्ता, जितेन दोशी, विक्रम शहा आणि त्यांच्या इतर अज्ञात साथीदारांविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रा. बारई यांना दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी ’१९९९ इनाम मुव्हिंग फॉरवर्ड’ नावाच्या एका संवाद गटामध्ये त्यांच्या संमतीशिवाय सामील करण्यात आले. या गटावर ’जितेन दोशी’ नावाचा इसम भाग बाजारातील वेगवेगळ्या भागांबद्दल माहिती देत होता व इतर सदस्यांना झालेल्या मोठ्या फायद्याच्या खोट्या पटप्रतिमा (छायाचित्रे) टाकत होता.गटावरील संदेश पाहून प्रा. बारई यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर, गटप्रमुख ’साक्षी गुप्ता’ हिने त्यांना ’इनाम’ नावाची एक बनावट प्रणाली उतरवून घेण्यास सांगितले. बारई यांनी ती प्रणाली स्थापित करून त्यात स्वतःची व अधिकोषाची (बँकेची) माहिती भरली. त्यानंतर, आरोपींनी सांगितलेल्या विविध १७ अधिकोष खात्यांवर प्रा. बारई यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२५ ते २९ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत वेळोवेळी एकूण ३ कोटी ३ लाख १५ हजार रुपये गुंतवले.


पैसे गुंतवल्यानंतर, बारई यांना त्या बनावट प्रणालीवर तब्बल २२ कोटी २९ लाख १९ हजार रुपयांचा प्रचंड फायदा झाल्याचे दिसू लागले. मात्र, दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी जेव्हा त्यांनी ही फायद्यातील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांना ’इनाम सेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ च्या नावाने एक बनावट ’सेवा शुल्क सूचनापत्र’ पाठवले. यात, पैसे काढण्यासाठी १५ टक्के सेवा शुल्क म्हणून ३ कोटी ३४ लाख ३७ हजार रुपये अतिरिक्त भरण्याची मागणी करण्यात आली. आरोपींनी फायद्याच्या रकमेतून सेवा शुल्क न कापता, उलट नवीन पैशाची मागणी केल्याने प्रा. बारई यांना संशय आला. त्यांनी ’विक्रम शहा’ याला संपर्क केला, मात्र त्यानेही मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. अखेर, आपली मोठी फसवणूक झाल्याची खात्री पटताच प्रा. बारई यांनी पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस करत होते. मात्र, फसवणुकीची रक्कम तीन कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे आणि गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने, हा गुन्हा आता पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles