शिवसेनेतील ‘राठोड पर्व’ संपले…
अहिल्यानगरमधील शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि नगरचे माजी आमदार स्व. अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ज्यांनी नगरमध्ये शिवसेना वाढविली, रुजवली आणि २५ वर्षे आमदारकी केली, अशा राठोड यांच्या मुलावर आज ही वेळ आली. पक्ष फुटला तेव्हा विक्रम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर उपेक्षा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी पक्षाची उमेदवारी देण्याचा अधिकार आणि अंतिम निर्णय ज्यांचा असे, त्या अनिल राठोड यांच्या मुलाला महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी याचना करण्याची वेळ यावी, हे दुर्दैव. शेवटी त्यांनी आज पुण्यात शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. स्वतः शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
हे सर्व पहात असताना जुना घटनाक्रम डोळ्यासमोर आला. अनिल राठोड यांचा राजकारण प्रवेश, त्यांना पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी मिळाल्याचा किस्सा, सलग पाच विजय, नंतर झालेला पराभव आणि कोविड काळातील त्यांचे अकाली निधन. या सगळ्या गोष्टी आठवतात.
पाहिली उमेदवारी थेट बाळासाहेबांकडून
अनिल राठोड यांना पहिली उमेदवारी मिळण्याचा किस्सा अत्यंत रंजक आणि नाट्यमय आहे. बाळासाहेब ठाकरेंनी राठोड यांच्यातील ‘लढाऊ बाणा’ ओळखून अत्यंत अनपेक्षितपणे त्यांची उमेदवारी जाहीर केली होती.
नगरमध्ये शिवसेनेची ताकद वाढत होती. १९९० च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत होते. नगर शहरातून शिवसेनेचा उमेदवार कोण असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वाडिया पार्क मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.
भाषणातून जिंकलं बाळासाहेबांचं मन
सभेत मुख्य भाषणं होण्यापूर्वी स्थानिक नेते आपली मनोगतं व्यक्त करत होते. अनिल राठोड यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाषण केले. त्यांच्या भाषणात नगरमधील प्रश्नांची जाण आणि हिंदुत्वाचा प्रखर आवेश होता. त्यांचे वक्तृत्व आणि जनसामान्यांवरील पकड पाहून बाळासाहेब प्रभावित झाले.
“हाच माझा उमेदवार!”
बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले. तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी व्यासपीठावरच अनिल राठोड यांना जवळ बोलावले आणि त्यांचा हात उंचावून जाहीर केले,
”नगरच्या मैदानात हा वाघ डरकाळी फोडतोय, मग दुसरा उमेदवार शोधायची गरज काय? आजपासून अनिल राठोड हेच नगर शहराचे शिवसेनेचे उमेदवार असतील!”
व्यासपीठावर बसलेल्या इतर वरिष्ठ नेत्यांनाही याची पूर्वकल्पना नव्हती. बाळासाहेबांनी कोणत्याही इतर नावाचा विचार न करता किंवा ‘फॉर्म’ची वाट न पाहता, थेट सभेतच उमेदवारीची घोषणा करून टाकली.
आणि सुरु झाली विजयाची परंपरा
बाळासाहेबांच्या या घोषणेनंतर शिवसैनिकांनी नगर शहर डोक्यावर घेतले. १९९० च्या निवडणुकीत अनिल राठोड मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग पाच वेळा (२५ वर्षे) नगर शहरातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून त्यांचा दोनवेळा पराभव झाला.
त्यानंतर करोना काळात राठोड आजारी पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा विक्रम आणि अन्य सहकाऱ्यांनी पक्ष सावरण्याचा प्रयत्न केला. पुढे पक्ष फुटल्यावर अनेकजण संधीच्या शोधात निघून गेले. विक्रम टिकून राहिले. पण पुढे सगळ्याच पक्षांत समीकरणे बदलत गेली. जुन्या नव्यांच्या संघर्षाला शिवसेनाही अपवाद राहिली नाही. आणि अखेर विक्रम यांनी पक्ष सोडला. शिवसेनेतील राठोड पर्वाचा असा शेवट झाला.
नगरमधील फायरब्रँड नेते माजी आमदार स्व.अनिल राठोड शिवसेनेतील ‘राठोड पर्व’ संपले…अखेर विक्रम यांनी पक्ष सोडला
- Advertisement -


