अहिल्यानगर-जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सोमवारी २१ जुलैपर्यंत ९२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. १४ जुलैला राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक विभागाने नगर जिल्ह्यातील गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. या रचनेवर २१ तारखेपर्यंत हरकत दाखल करण्यास मुदत होती. दरम्यान, दाखल हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली असून दाखल हरकतींवर सोमवार (दि. ११) रोजी संबंधितांना निकाल कळवण्यात येणार असून त्यानंतर १८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाच्या रचनेवर ९२ हरकती दाखल झाल्या होत्या. यात देखील एकट्या जामखेड तालुक्यातील ४४ हरकतींचा समावेश होता. तर पारनेर १५, अकोले १०, नगर ८, संगमनेर ५, कर्जत ४, कोपरगाव आणि राहाता ३, श्रीगोंदा १, शेवगाव आणि राहुरी तालुक्यात प्रत्येकी १ अशा हरकती दाखल झाल्या होत्या. नेवासा, श्रीरामपूर आणि पाथर्डी तालुक्यात एकही हरकत दाखल झाली नव्हती. दाखल हरकती गट व गणातून गाव वगळणे तसेच समावेश करणे अशाच स्वरूपाच्या आहेत. १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण याचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता. यावर सोमवार २१ जुलैपर्यंत हरकती व सुचना देण्याची शेवटी मुदत होती. प्रारूप प्रभाग रचना जाहीर करतांना जिल्हा परिषदेचे ७५ व पंचायत समितीचे १५० गणांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची नावे व नकाशा जाहीर करण्यात आले होते. ही रचना २०११ च्या लोकसंख्येच्या आधारवर असून झेड पद्धतीने हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. अकोल्याच्या समशेरपूरपासून ते जामखेडच्या खर्डापर्यंत असा हा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर हरकती व सुचना पाऊस पडेल असे वाटले होते. प्रत्यक्षात दिलेल्या मुदती अवघ्या ९२ तक्रारी आल्या होत्या.
गटातील गाव या गट व गणात पाहिजे होते. किंवा या गावाचा समावेश या गट व गणात करण्यात यावा, गट व गणाचे नाव पूर्वी जे होते तेच ठेवण्यात यावे, पूर्वी ज्या गट व गणात गाव होते त्याच गट व गणात ते ठेवण्यात यावे, दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून एक गाव या गणात तर दुसरे गाव त्या गणात गेले आहे. ते एकाच गणात ठेवण्यात यावे अशा स्वरूपांच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. दाखल हरकतीवर सुनावणी पूर्ण झाली असून आता सोमवारी हरकत घेणाऱ्यांना त्यांच्या हरकतीवर घेण्यात आलेला निकाल कळवण्यात येणार आहे.
प्रभाग रचनेनंतर आरक्षण
११ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचनांवर सुनावनणी घेऊन निर्णय घेतला जाणार असून १८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे. याच दिवशी जिल्ह्यातील गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. ही प्रभाग रचना जाहीर झाल्यावर पुढे गट आणि गणाचे आरक्षण यासह निवडणुकीसाठी आवश्यक पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.