Monday, February 23, 2026

नगरमध्ये हनिट्रॅपद्वारे लुटीचा प्रकार उघड; पाच आरोपी अटकेत २ तरुणींचा ही समावेश

अहिल्यानगर : प्रेमाचा बहाणा करत हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढले. ‌‘ती‌’च्या गोडीगुलाबीला भुलून तोही थेट भेटीसाठी बारदरी येथे पोहचला. तेथे त्या दोघींनी मित्रांच्या मदतीने त्याला लुटले. फिर्यादीने बदनामीपोटी रस्ता लुटीची तक्रार दिली, पण याच रस्ता लुटीचा तपास करत असताना पोलिसांना या हनीट्रॅपचा उलगडा झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन तरुणींसह तिघांना अटक करत 2 लाख 88 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

शुभम शहादेव बडे (रा. वाणीनगर, सावेडी), सोहेल पापाभाई सय्यद (रा. देवटाकळी, शेवगाव), अशपाक नासिर पठाण (वय रा. यशवंतनगर,भिंगार), वैष्णवी राजेंद्र उनवने (रा. भगवान बाबा चौक,अहिल्यानगर), रुपाली गजानन बनकर (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोने खरेदी करणारा सराफ सुरज प्रदीप शहाणे (रा. शास्त्रीनगर, केडगाव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी बारदरी (ता.अहिल्यानगर) गर्भगिरी फाटा येथे लघुशंकेसाठी रस्त्याचे कडेला थांबले असता मोटरसायकलावरुन आलेल्या तिघा अनोळखींनी गळ्याला कोयता लावून बळजबरीने सोने-चांदीचे दागिने रोकड लुटली, अशी तक्रार पोलिसां दिली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार कबाडी यांनी सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये, पोलिस अंमलदार दीपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रशांत राठोड, अमृत आढाव, योगेश कर्डिले, सोनल भागवत, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून आरोपींच्या शोधाकामी रवाना केले.

पोलिस पथकाने घटनास्थळी जावून पाहणी करून गोपनीय माहिती घेतली. वरील गुन्हा संशयित शुभम बडे याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो सध्या तपोवन रोड येथे दुचाकीवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तपोवन रोड येथे सापळा लावून शुभम बडे याच्यासह अन्य साथीदारांना ताब्यात घेतले. शुभम बडे याने अन्य दोन मैत्रिणीच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिस पथकाने संशयित वैष्णवी उणवने, रुपाली बनकर यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीचे दागिने सराफाला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी सराफालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी सोने दागिनेसह दुचाकी, मोबाईल, लोखंडी कोयता असा दोन लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपींना नगर तालुका पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

आरोपींनी हनिट्रॅप करून लुट केल्यानंतर थेट गोवा गाठला. गोव्याच्या बिचवर चांगली मज्जा केली. मात्र, पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता ते गोव्यात असल्याची माहिती मिळाली. मौजमजा करून ते नगरमध्ये येताच एलसीबीच्या पोलिसांनी झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

एलसीबीच्या पथकाने जबरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली. चौकशीत हनिट्रॅपसारखा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अन्य तीन आरोपी हाती लागले आहेत. याच आरोपींनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

किरणकुमार कबाडी, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles