जामखेड-तु माझ्याशी फोनवर बोलत का नाही? माझा नंबर का ब्लॉक केला? असे म्हणत एकाने नृत्यांगनेेवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गायत्री तुषार सावंत (वय 26 वर्षे, नृत्यांगना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक कचरे विरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नृत्यांगना गायत्री तुषार सावंत, रा. वाघोली, जिल्हा पुणे (हल्ली रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) ही तिच्या मैत्रिण मनिषा प्रकाश जावळे हिच्यासोबत जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहते. गायत्री हे नृत्यांगनाचे काम करून आपली उपजीविका भागवते. मागील पाच वर्षांपासून तिचे आरोपी राहूल अशोक कचरे, रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड याच्याशी मैत्रीचे संबंध होते, परंतु 2024 पासून हे संबंध संपले आहेत. यापूर्वीही गायत्रीने राहुल कचरे विरोधात एक गुन्हा दाखल केला होता.गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता, आरोपी राहुल कचरेने गायत्रीला फोन करून म्हटले की, तु माझ्याशी फोनवर बोल; माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर बोलली नाहीस, तर मी तुला मारीन. या वेळी गायत्रीने त्याचा कॉल कट केला. त्यानंतर शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 2 वाजता, गायत्री आपल्याच रूममध्ये मैत्रिण मनिषा जावळेसोबत होती. मनिषा काही कामासाठी बाहेर गेली असता, राहुल तिथे लपून बसलेला होता. नंतर तो गायत्रीच्या रूममध्ये आला, हातात कोयता होता, आणि तिला विचारले की, तु माझ्याशी का बोलत नाही? माझा नंबर का ब्लॉक केला? आणि तिला हल्ला करून गंभीर जखमी केले.
त्यावेळी मैत्रिण मनिषा जावळेने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु राहुलने धमकी दिली की, मी तुला संपवून टाकणार आहे आणि निघून गेला. आरोपी सध्या फरार असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.


