किरण काळेंची निवड शिवसेना ठाकरे पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करुन देणारी -सर्जेराव ठोंबरे
शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल काळेंचा सत्कार
नगर (प्रतिनिधी)- किरण काळे यांच्या रुपाने एक संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व शहरातील राजकारणात योगदान देत आहे. त्यांचे राजकारण फक्त सत्ता व खुर्चीसाठी नसून, लोकांच्या जीवनात आणि शहरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सुरु आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक बदलाचा विडा उचलला आहे. शहरात शिवसेना ठाकरे पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी त्यांची शहर प्रमुख म्हणून झालेली निवड युवकांना दिशा देण्याचे कार्य करणार असल्याची भावना महाराष्ट्र राज्य वायरलेस संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव ठोंबरे यांनी व्यक्त केली.
किरण काळे यांची अहिल्यानगर शिवसेनेच्या (उ.बा.ठा.) शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ठोंबरे बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी भाऊसाहेब शिंदे, जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी काळे यांना निवडी बद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना किरण काळे म्हणाले की, मी शहरातील सर्व जुन्या-नवीन शिवसैनिकांची मोट बांधण्याचे काम करीत आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला माझ अधिक प्राधान्य आहे. स्व.अनिल राठोड यांचा खरा हिंदूत्वाचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम शहर शिवसेना करत आहे. शहरातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, तसेच सेवेतील कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माझा कायम प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किरण काळेंची निवड शिवसेना ठाकरे पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करुन देणार
- Advertisement -


