अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) भूमिका ही माझी जबाबदारी आहे आणि हिंदुत्व हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे जबाबदारी आणि कर्तव्य या दोन्ही भूमिका मी पार पाडेल, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे असल्याचे पत्रकारांशी बोलताना आज, शनिवारी स्पष्ट केले. जिल्हा सरकारी रुग्णालयातील अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचे लोकार्पण आमदार जगताप व माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी आमदार जगताप पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आदी उपस्थित होते.पक्षाच्या विचारधारेपेक्षा कट्टर हिंदुत्वाची वेगळी भूमिका स्वीकारल्याच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार जगताप यांना सल्ला दिला होता. याकडे लक्ष वेधले असता आमदार जगताप म्हणाले, पक्षाच्या भूमिकेसंदर्भात मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जबाबदारी दिली, निवडून दिले. ते मी पार पाडतोच आहे. परंतु हिंदुत्व हे माझे कर्तव्य आहे, तेही मी पार पाडतो आहे. मतदारांनी टाकलेली जबाबदारी आणि मी स्वीकारलेले कर्तव्य दोन्ही मला पार पाडायचे आहे.
शहर मतदारसंघातील मतदार यादीत अनेक बांगलादेशींची नावे आहेत. अनेक बांगलादेशी नगरमध्ये आढळले आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत, अटकही झाली आहे. परंतु, मुळापाशी जाऊन पोलिसांनी तपास केला नाही. मतदार यादीत त्यांची नावे आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. जी मतदार यादी लोकसभा निवडणूक वेळी होती, तीच विधानसभेच्या निवडणूक वेळेलाही होती. परंतु, पराभूत झाले की मतदार यादी आणि मतदान यंत्र याला दोष दिला जातो, अशी टीकाही आमदार जगताप यांनी केली.


