Tuesday, February 24, 2026

देहूच्या पावन भूमीवर ‘आपला मावळा ’ रणशिंग फुंकणार! खा.लंके यांच्या उपस्थितीत २४ जानेवारीला भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

देहूच्या पावन भूमीवर ‘आपला मावळा ’ रणशिंग फुंकणार!

खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत २४ जानेवारीला भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

अहिल्यानगर : प्रतिनिधी

संत तुकाराम महाराजांच्या पावन चरणांनी स्पर्श झालेल्या देहू नगरीत अस्वच्छता आणि पर्यावरण ऱ्हासाविरोधात थेट मैदानात उतरायची तयारी ‘आपला मावळा’ संघटनेने केली आहे. खासदार नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने २४ जानेवारी रोजी देहूत स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. पवित्र देहूच्या सन्मानासाठी ही मोहीम म्हणजे एक सामाजिक लढाच ठरणार आहे.

या मोहिमेत देहू शहरातील प्रमुख रस्ते, घाट परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच नदीकाठाची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. केवळ कचरा उचलण्यापुरते मर्यादित न राहता, देहू परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक कसा राहील, यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी वृक्षारोपण करून हिरव्या देहूचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात येणार आहे.

या स्वच्छता मोहिमेत आपला मावळा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते, स्वयंसेवक, स्थानिक नागरिक तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. देहूच्या पावन भूमीसाठी ‘मावळे’ एकदिलाने मैदानात उतरणार असून, स्वच्छतेसाठी श्रमदानातून एकजूट दाखविणार आहेत.

खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार असून, यावेळी स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण रक्षण आणि नागरिकांची जबाबदारी यावर भर देत जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश या मोहिमेतून दिला जाणार आहे.

“स्वच्छ देहू – हरित देहू” या ठाम संकल्पनेतून ही मोहीम राबवली जात असून, समाजातील प्रत्येक घटकाने स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. पवित्र देहूच्या गौरवाला साजेसा स्वच्छ व हिरवा परिसर निर्माण करण्यासाठी ही मोहीम मैलाचा दगड ठरणार आहे.

आपला मावळा संघटना आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणारी ही मोहीम सामाजिक भान, पर्यावरणाची जबाबदारी आणि सामूहिक सहभागाचे ठोस उदाहरण ठरणार असून, देहूच्या पावन भूमीवर स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles