अहिल्यानगर-महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला असून, 6 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. तर, हरकती व सुनावणीनंतर 28 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. दरम्यान, मनपाची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान जाहीर होणार होती. मुदतीनंतर देखील अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली नाही. अंतिम प्रभाग रचना जाहीर होत नसल्याने अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर आरोप केले आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. 28 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचनावर सुनावणी घेत निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येतील. त्यानंतर 4 डिसेंबर 2025 रोजी मतदार केंद्रे प्रसिध्द होतील. 10 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.
दरम्यान, प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला असला तरी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होत नसल्याने संशय कल्लोळ वाढला आहे. विविध राजकिय पक्षाने यावर आक्षेप घेणे सुरू केले आहे. अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवरच आरोप करून न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.


