अहिल्यानगर -भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहित यांचे पुत्र सुजय मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी पसरली आहे.
केडगावात प्रभाग 16 मध्ये उबाठा गटाचे दोन नगरसेवक अमोल येवले व विजय पठारे यांनी महायुतीत बिघाडी होताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे येथून इच्छुक असणारे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते साहेबराव विधाते, धनंजय जामगावकर यांना धक्का बसला. तशीच अवस्था प्रभाग 17 ची असून, याठिकाणाहून केडगाव भाजप मंडल अध्यक्ष भरत ठुबे यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले नाही.
गेल्या पंचवार्षिकला त्यांचे बंधू शरद ठुबे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. याशिवाय भाजपच्या नगरसेविका गौरी नन्नावरे यांना तिकीट न दिल्याने त्यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. याशिवाय नगरसेविका लता शेळके यांच्या जागी कमल जालिंदर कोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल कांबळे यांचा पत्ता कट केला.
सावेडी मंडलाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या पत्नी मनिषा बाररस्कर यांना प्रभाग सातमधून डावलण्यात आले. त्यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. मात्र, एबी फॉर्म जोडला नाही. मभाजपने माजी नगरसेवक अजय चितळे, रवींद्र बारस्कर, पल्लवी जाधव, राहुल कांबळे, लता शेळके, गौरी नन्नवरे, संगीता खरमाळे, नितीन शेलार, स्वीकृत नगरसेवक रामदास अंधाळे यांना उमेदवारी नाकारली. माजी नगरसेविका संगीता खरमाळे, नितीन शेलार यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली.
महायुती दुभंगल्यानंतर शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर भाजप-राष्ट्रवादीची युती झाली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे सूर मात्र जुळले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी पक्षाकडून डावलले गेलेल्यांनी पक्षनिष्ठा खुंटीला टांगल्याचे दिसून आले.
उमेदवारीसाठी ऐनवेळी पक्षाकडे आलेल्या आयारामांना प्राधान्य देत त्यांना उमेदवारी देण्यात आली. आता बंडखोरी रोखण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर उभे ठाकले आहे. माघारीसाठी दोन दिवस असल्याने बंडखोरी करून अर्ज भरलेल्यांंची मनधरणी करण्याची कसरत करावी लागणार आहे.काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या सौभाग्यवती शीला चव्हाण, उबाठा सेनेचे निष्ठावंत गिरीश तुकाराम जाधव, हर्षवर्धन कोतकर, प्रदीप परदेशी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकली. भाजपने डावलल्याने निष्ठावंतांनी ऐनवेळी शिवसेनेकडे धाव घेत धनुष्यबाण उचलले. भाजपच्या संगीता खरमाळे, नितीन शेलार, नरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेविका गौरी नन्नवरे व राष्ट्रवादीचे अमित खामकर, अभिजीत भिंगारदिवे, निर्मला गिरवले यांनीही शिवसेनेची उमेदवारी मिळवली आहे.
भाजप-राष्ट्रवादीची युती झाली असली तरी उमेदवारी देताना अनेकांच्या सोईसाठी एकमेकांच्या चिन्हांची अदलाबदल करण्याची वेळ आली. राष्ट्रवादीच्या रोशनी प्रवीण भोसले-त्रिंबके, सागर राजू मुर्तडकर, विकास किशोर वाघ आणि सेनेचे विजय मोहन पठारे, ज्ञानेश्वर शिवाजी येवले यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपच्या गीतांजली सुनील काळे, आशा किशोर डागवाले, महेश तवले आणि सेनेच्या सुनीता भगवान फुलसौंदर आणि सुनीता महेंद्र कांबळे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे.


