Thursday, February 19, 2026

अहिल्यानगर मनपा निवडणुक ; शिवसेनेच्या उमेदवाराला पोलीस संरक्षण देण्याची मागणी

प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दहशतीपोटी शिवसेनेच्या उमेदवाराला पोलीस संरक्षण देण्याची मागणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांना शिवसेनेचे निवेदन; प्रभाग 11 संवेदनशील घोषित करा
निवडणूक प्रचारात अडथळे व धमक्यांचा नरेंद्र कुलकर्णी यांचा आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार नरेंद्र कुलकर्णी यांनी केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून धमकावणे, दहशत निर्माण करणे व प्रचारात अडथळे आणण्याचे प्रकार सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 9 जानेवारी) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन कुलकर्णी यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची तसेच प्रभाग क्रमांक 11 हा संवेदनशील प्रभाग म्हणून घोषित करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, नरेंद्र कुलकर्णी, संजय शेंडगे, गणेश कवडे, दिपक खैरे, श्‍याम नळकांडे, मयूर मैड, दत्ता जाधव, संदीप दातरंगे, सचिन शिंदे, सतीश मैड, प्रशांत गायकवाड, श्‍याम शिंदे, संदेश कार्ले, संतोष ग्यानप्पा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते आपल्या पत्नी व मुलासह प्रभाग क्रमांक 11 मध्ये वास्तव्यास असून, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सर्वसाधारण पुरुष ‘ड’ प्रवर्गातून धनुष्यबाण या चिन्हाखाली शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. या प्रभागातून सत्ताधारी पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.
कुलकर्णी यांचा आरोप आहे की, प्रतिस्पर्धी हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असून त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचारादरम्यान जाणूनबुजून अडथळे निर्माण केले जात असून, घराबाहेर मोठ्या संख्येने जमाव करून दहशत निर्माण केली जात आहे. यामुळे प्रचार करणे तसेच दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले असून प्रचंड मानसिक तणावाखाली कुटुंब राहात आहे.
कुलकर्णी यांनी 8 जानेवारी रोजी रात्री तख्ती दरवाजा परिसरात घडलेल्या घटनेचा उल्लेख करत सांगितले की, त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने जमून शिवीगाळ, धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिली. “तू माझ्याविरुद्ध निवडणूक का लढवतोस, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेवेळी पोलीस उपस्थित असतानाही त्यांनी हस्तक्षेप न केल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.
या संपूर्ण प्रकारामुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात अनुचित घटना किंवा दंगलसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले आहे. त्यामुळे स्वतःच्या व कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करत त्यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच 20 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत निवडणूक दहशतमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी दोषींवर कारवाई केली जाईल तसेच कुलकर्णी यांना पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles