महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
११ नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढणार, २४ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
अहिल्यानगर – राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध होऊन ११ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
१) आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करणे – ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
२) आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे – ८ नोव्हेंबर
३) आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे – ११ नोव्हेंबर
४) प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करणे – १७ नोव्हेंबर
५) प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक – २४ नोव्हेंबर
६) प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन महानगरपालिका आयुक्त यांनी निर्णय घेणे – २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर
७) आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करणे – २ डिसेंबर


