महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
कायनेटिक चौक, बसस्थानक रोड, लालटाकी परिसरातील अतिक्रमणे हटवली, रस्त्यावरील साहित्य जप्त
नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत अन्यथा महानगरपालिकेकडून कारवाई : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – शहरातील स्वच्छता व अतिक्रमणांवर गुरुवारी आमदार संग्राम जगताप व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर महानगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासून शहरातील प्रमुख मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कायनेटिक चौक, बसस्थानक रोड, लालटाकी आदी परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
शुक्रवारी सकाळी कायनेटिक चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. चौकालगत असलेल्या टपऱ्या, दुकानांसमोरील पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. त्यानंतर सक्कर चौकापासून महावीर कलादालन, मार्केटयार्ड चौकापर्यंत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तेथील रस्त्यावरील हातगाड्या हटवण्यात आल्या. लालटाकी अप्पू चौकातील दुकानदारांनी रस्त्यावर साहित्य टाकून अतिक्रमण केले होते. तेही पथकाने कारवाई करून जप्त केले.
शहरात सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे. अतिक्रमणे स्वतःहून काढून न घेतल्यास महानगरपालिका जेसीबीच्या सहाय्याने ती हटवेल. यात नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.


