अहिल्यानगर महापालिकेची प्रारुप प्रभागरचना बुधवारी (दि.3) प्रसिध्द होणार आहे. या प्रारुप प्रभागरचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. दाखल होणार्या हरकतींवर 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे. आपला परिसर कोणत्या प्रभागात समाविष्ट झाला याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी सुरु आहे. त्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शासनाने अहिल्यानगर पालिकेसाठी 17 प्रभाग निश्चित केले असून, एका प्रभागातून चार नगरसेवक त्यानुसार एकूण 68 नगरसेवकांच्या जागा निश्चित केल्या आहेत.
महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखाली 17 प्रभागांचे प्रारुप तयार करण्यात आले असून, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्यानंतर बुधवारी (दि.3) ते 17 प्रभागांची प्रारुप प्रभागरचना प्रसिध्द करणार आहेत.
नागरिकांना अवलोकन करण्यासाठी प्रारुप 17 प्रभागांत तसेच महापालिका कार्यालयात उपलब्ध होणार आहे.
या प्रारुप प्रभागरचनेवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असून, उपलब्ध होणार्या हरकतींवर 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी नियुक्त अधिकारी सुनावणी घेणार आहेत. राज्य निवडणूक विभागाची मान्यता मिळाल्यानंतर आयुक्त यशवंत डांगे 9 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करणार आहेत.