शहरातील वाहतूक नियोजनासाठी एकेरी वाहतुकीसाठी महानगरपालिकेचा प्रस्ताव
नागरिकांना सूचना व हरकती दाखल करण्यासाठी १७ डिसेंबरपर्यंत मुदत
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
अहिल्यानगर – शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील सूचना, शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या सूचना यानुसार एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
चौपाटी कारंजा ते आनंदी बाजार चौक ते कोर्ट मागील रोड ते झारेकर गल्ली कोपरा, शनिगल्ली ते कोर्टासमोरील बाजू (कोर्ट गल्ली) ते पटवर्धन चौक ते चितळे रोड, आनंदी बाजार चौक ते अमरधाम व शनिमारूती मंदिर (टांगे गल्ली) ते झारेकर गल्ली, अर्बन बँक चौक ते कापड बाजार मुंबई मिठाईवाला व मुंबई मिठाईवाला चौक ते शांती होजिअरी ते अर्बन बँक चौक, लोढा हाईटस ते नवीपेठ रोड ते शहर सहकारी बँक चौक व भिंगारवाला चौक ते कापड बाजार ते बॉम्बे बेकरी चौक, पंचपीर चावडी चौक ते आशा टॉकीज रोड व माणिक चौक ते मदहोशा पीर चौक, जुनी मनपा चौक ते वाडीया पार्क चौक व माळीवाडा वेस ते अप्सरा टॉकीज चौक ते पंचपोर चावडी चौक, कोठी चौक ते हातमपुरा चौक ते सुरेश गेम कॉर्नर व नालबंद खुंट ते धरती चौक ते बंगाल चौकी ते मुंजोबा स्वीट कॉर्नर चौक, रामचंद्र खुंट चौक ते मंगलगेट चौक ते पुणे हायवेपर्यंत व फलटण पोलिस चौकी चौक ते राजेंद्र हॉटेल चौक ते दाळमंडई चौक, तसेच फलटण पोलिस चौकी ते हुंडेकरी ऑफिस चौक ते नटराज चौक ते पुणे हायवे ते पुन्हा फलटण पोलिस चौकी अशा रस्त्यांवर एकेरी वाहतूक प्रस्तावित आहे.
या एकेरी वाहतुकीबाबत नागरिकांच्या हरकती, सूचना किंवा आक्षेप असल्यास १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत शहर प्रभाग समिती कार्यालय (जुनी मनपा), झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालय व
मुख्य प्रशासकीय कार्यालयात दाखल कराव्यात, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.


