राहाता : चांदेकसारे (ता. कोपरगाव) येथे जुन्या खाणीच्या खोल पाण्यात पडलेल्या मेंढीला वाचवताना पडल्याने बुडून सख्ख्या भावा-बहिणीचा करुण अंत झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील डाऊच खुर्द येथे घडली. खाणीत जास्त पाणी आणि दलदल असल्यामुळे दोघेही घाबरल्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले. शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थिवावर डाऊच खुर्द येथे अत्यंत शोकाकुल आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गणपत बडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सार्थक गणपत बडे व सुरेखा गणपत बडे (दोघेही, रा. डाऊच खुर्द) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे डाऊच खुर्द परिसरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. डाऊच खुर्द येथील गणपत बडे यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. शनिवारी त्यांचा मुलगा सार्थक आणि मुलगी सुरेखा हे चांदेकसारे परिसरात जुन्या खोदकाम केलेल्या खाणीजवळ मेंढ्या चारत होते. मेंढ्या पाणी पिण्यासाठी खाणीजवळ गेल्या असता, त्यातील एक मेंढी पाण्यात पडली. मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखाने प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि पाय घसरल्याने ती खाणीच्या खोल पाण्यात बुडू लागली. बहिणीला बुडताना पाहून भाऊ सार्थक याने क्षणाचाही विलंब न करता तिला वाचवण्यासाठी खाणीत उडी घेतली. मात्र, खाणीत जास्त पाणी आणि दलदल असल्यामुळे दोघेही घाबरल्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले. आजूबाजूला कपडे धुण्यासाठी थांबलेल्या काही महिलांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आरडाओरड करून नागरिकांना याबाबत कळवले.
पोलीस पाटील मीरा रोकडे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, उपसरपंच वसिम शेख यांनी घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना दिली. संजय गुरसळ यांनी तरुणांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी तत्काळ हजर झाले. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थिवावर डाऊच खुर्द येथे अत्यंत शोकाकुल आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गणपत बडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुकडे हे करीत आहेत.


