Friday, February 20, 2026

Ahilyanagar news : बोगस दस्त नोंदवून फसवणूक ; सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर -वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शहरातील कुंभार गल्ली परिसरातील शेतकरी दीपक लक्ष्मण डावखर (वय 53) यांनी आपल्या आई, बहिणी, मेहुणे तसेच शहरातील काही उद्योजकांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्त नोंदणी व धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दीपक लक्ष्मण डावखर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, त्यांची श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील जुना गट नं. 81/1, व नवीन गट क्र. 100/9 मधील क्षेत्रफळ 3.71 हेक्टर शेतजमीन वडील लक्ष्मण परशुराम डावखर यांच्या सन 2011 मधील मृत्यूपत्राद्वारे त्यांच्या नावावर झाली होती. या जमिनीचा 7/12 उतारा व मालकी नोंद आजही त्यांच्या नावावर आहे. तरीसुद्धा कुटुंबातील काही सदस्यांनी आणि बाहेरील उद्योजकांनी संगनमत करून कोर्टाच्या स्थगिती आदेशाची पायमल्ली करत खोटा आपसमजुतीचा करार नोंदवला, असा गंभीर आरोप त्यांनी फिर्यादीत केला आहे.

श्री. डावखर यांनी स्पष्ट केले की, त्यांची सख्खी आई सुशिलाबाई लक्ष्मण डावखर व बहीणी वैशाली शिवराम साठे, अर्चना भास्कर दिघे यांनी इतर काही नातेवाईक व उद्योजक शेख अंजुम परवेज मुसा अहमद, पत्नी शेख समीना अंजुम, मुलगा शेख अंजर अंजुम (रा. नफीस पॅलेस, श्रीरामपूर) यांच्या संगनमताने हा व्यवहार केला. या व्यवहारात एक कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

दि. 5 जानेवारी 2023 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवताना त्यांची व बहीण मीना प्रभाकर खर्डे यांची कोणतीही सही किंवा संमती न घेता, अपूर्ण वंशावळ दाखवून बोगस दस्त नोंदविण्यात आला. न्यायालयीन खटला सुरू असतानाही सब-रजिस्ट्रार कार्यालयाने हा दस्त नोंदवला, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यापूर्वी सन 2021-22 मध्ये विलास सासे आणि अनिल इंगळे यांच्याशी झालेल्या जमीन व्यवहारात ठरलेले धनादेश न वटल्याने व्यवहार अपूर्ण राहिला. मात्र, त्याच जमिनीचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी संबंधितांनी त्यांना धमकावले आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.माझ्या मालकीची जमीन खोटी कागदपत्रे तयार करून विकली गेली. माझ्या व बहीण मीना खर्डे यांच्या संमतीशिवाय बनावट दस्त नोंदवून आमची फसवणूक करण्यात आली. सदर प्रकरणात वैशाली शिवराम साठे, अर्चना भास्कर दिघे, जनाबाई ऊर्फ बबई लक्ष्मण डावखर, सुशिलाबाई लक्ष्मण डावखर, अनिल माणिक इंगळे, विलास अशोक सासे, शेख अंजुम परवेज मुसा अहमद या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 364 ए,420, 406, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला, असून दस्त नोंदणी प्रक्रीयेत सब-रजिस्ट्रार कार्यालयाच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बोगस दस्त नोंदवून, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होताच, सदर गुन्ह्यामध्ये माजी नगरसेवक अंजुम शेख यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांचा अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर न्यायालयाने मंजूर केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles