संगमनेर -साकूर परिसरातील दोन अल्पवयीन चुलत बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातील इंदिरानगरमध्ये पतीने पत्नीचा खून करुन स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.7) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहेे.याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की कुलदीप सुनील अडांगळे (वय 35) व वैष्णवी संजय खांबेकर (वय 22) हे दोघे काही दिवसांपूर्वी मुंबई येथे राहत होते. परंतु, दोघांमध्ये वारंवार भांडणं होत असल्याने पत्नी वैष्णवी ही वैतागून दीड महिन्यांपूर्वी माहेरी संगमनेरला निघून आली होती. त्यानंतर साधारण तीन दिवसांपूर्वी कुलदीप हा देखील संगमनेरला आला. त्यावर तो आपल्या पत्नीला इंदिरानगर येथील घरी घेऊन आला. परंतु, येथेही वाद होवून त्याने वैष्णवीला जबर मारहाण करुन खून केला आणि स्वतःही पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
याप्रकरणी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालावरुन शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करत आहे.


