घनकचरा व्यवस्थापन कंत्राटातील भ्रष्टाचाराबाबत सरकारकडे तक्रार करणार : अभिषेक कळमकर
नगर : अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता अभियानात केंद्र स्तरावर बक्षिस मिळवल्याचा गवगाव करीत मनपाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली. पाच कोटींचे बक्षिस मिळाल्याने आनंदोत्सवही साजरा करण्यात आला. प्रत्यक्षात नगर शहरातील परिस्थिती पाहिली तर शहराला अक्षरश: उकिरड्याचे स्वरूप आले आहे. शहरातून दररोज सुमारे 150 टन कचरा उचलला जात असताना ठेकेदाराला मात्र 190 ते 200 टन कचरा उचलण्याचे बिल अदा केले जाते. हा मोठा भ्रष्टाचार असून याबाबत आता खा.निलेश लंके यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात कळमकर यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथजन्य आजार पसरु नये यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्वाची आहे. एकीकडे मनपा प्रशासन डेंग्यु मुक्त अभियान राबवित असताना शहरात कचरा संकलनाचा बोजवारा उडालेला आहे. सार्वजनिक जागांवर कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस पडून आहेत. याठिकाणी मोकाट कुत्री, जनावरांचा उच्छाद झाला आहे. या कचऱ्याची दुर्गंधी व घाणीमुळे नगरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक दिवस कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने घरोघरी जमा झालेल्या कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नागरिकांचा रोष लक्षात घेवून मनपा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या इच्छुकांनी स्वखर्चाने कचरा संकलन करुन तो बुरुडगाव कचरा डेपोपर्यंत नेण्याची व्यवस्था केली आहे. खरे तर मनपा प्रशासनासाठी नामुष्कीची बाब आहे. मनपाला स्वच्छता अभियानात बक्षिस रुपाने मिळालेल्या पाच कोटी रुपयांचे काय झाले, असा प्रश्नही यानिमित्त उपस्थित होत आहे.
कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्यांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी, त्यातील गैरव्यवहार सहन केला जाणार नाही. यासाठी वेळप्रसंगी यासाठी शहरात ठिकठिकाणी जावून मनपाचा घनकचरा व्यवस्थापनातील गैरकारभार मांडण्यात येईल याची आयुक्त तथा प्रशासनाने नोंद घ्यावी. कारण लोकनियुक्त नगरसेवकांनी यापूर्वी वेळोवेळी सभागृहात घनकचरा व्यवस्थापन कामातील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला होता. तरीही त्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना न केल्यास कचरा जमा करून तो महानगरपालिकेच्या आवारात टाकून आंदोलन करण्यात येईल.
दिशा समितीत खा.निलेश लंके यांनीही वेधले लक्ष…
केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या योजनेतून अहिल्यानगर शहरात घनकचरा व्यवस्थापनासह अनेक योजना चालू आहेत. केंद्राच्या निर्देशानुसार नेमलेल्या दिशा समितीचे खा.निलेश लंके हे सहअध्यक्ष आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत नगर मनपातील घनकचरा व्यवस्थापन कामातील भ्रष्टाचारासह इतर योजनांचा मुद्दा उपस्थित करून शहरातील सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नगरकरांना चांगल्या मूलभुत सोयी सुविधा मिळणे अत्यावश्यक असल्याचे खा.लंके यांनी म्हटले आहे.