संगमनेर: तालुक्यातील साकूर येथे बनाचा रोड परिसरात अल्पवयीन असलेल्या दोन सख्ख्या चुलत बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 6) दुपारी चारच्या सुमारास घडली.
गणेश विसर्जनाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने साकुर परिसरात शोककळा पसरली आहे. तन्वी अजित सगळगिळे (वय 17) व मानसी राजेंद्र सगळगिळे (वय 13) अशी त्यांची नावे होत.याबाबत विकी पोपट सगळगिळे यांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आई शेतात कामाला गेली होती. भाऊ दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त वाशीम येथे गेला होता. मी दुपारी चारच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी साकूर गावात गेलो होतो.
तेव्हा पुतणी तन्वी घरीच होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माझी आई शेतातून घरी आली, तेव्हा घरात तन्वी हिने पांढर्या रंगाच्या दोरीने पत्र्याच्या लोखंडी अँगलला फाशी घेतल्याचे दिसले. तिला लगेच खाली उतरवून रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. वैद्यकीय अधिकार्याने तपासणी करून तिला मृत घोषित केले.
दरम्यान, शेजारी राहणारा भाऊ राजेंद्र आचारी कामासाठी ओतूर येथे गेला होता. त्याची मुलगी मानसी हिनेही घरामध्ये पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने फाशी घेतली. तिचाही मृत्यू झाला. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली. या दोघींच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घारगाव पोलिस तपास करत आहेत.


