Thursday, October 30, 2025

समाजाने महापुरुषांच्या विचारांचे सोने लुटण्याची आवश्यकता : खा. निलेश लंके

समाजाने महापुरुषांच्या विचारांचे सोने लुटण्याची आवश्यकता : खा. निलेश लंके

दसरा व महात्मा गांधी जयंती निमित्त नगरमध्ये महापुरुषांच्या पुतळा परिसरात स्वच्छता अभियान

अहिल्यानगर : प्रतिनिधी

महात्मा गांधीच्या जीवनकार्याचे अत्यंत महत्वाचे पैलू म्हणजे सार्वजनिक स्वच्छतेवरील भर आणि सर्वधर्म समभावाची भूमिका. त्यांच्या विचारांमधील या दोन्ही बाबी सामाजिक एकात्मता, आत्मशुध्दी आणि राष्ट्रनिर्मितीशी जोडलेल्या होत्या. विजयादशमी आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरातील महापुरुषांच्या पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आजच्या काळात महापुरुषांच्या विचारांचे सोने लुटण्याची गरज आहे. नगर शहरातील मागील काही काळातील वातावरण पाहता सत्य, अहिंसा आणि एकतेची आवश्यकता आहे असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व विजयादशमी निमित्त खा.निलेश लंके व आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यानगर शहरात स्वच्छ भारत-एकतेचा संकल्प हे अभियान राबविण्यात आले. सकाळी साडेसात वाजता वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून अभियानाला सुरुवात झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, समाजसुधारक वस्ताद लहुजी साळवे, शहीद भगतसिंग, हुतात्मा करवीर चौथे छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, आनंदधाम परिसरातील आनंदॠषीजी महाराज समाधी स्थळ, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, गिरीश जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे, संजय गारुडकर, अशोक बाबर, मंदार मुळे, माजी नगरसेवक संजय झिंजे, दत्ता कावरे, सुनील त्रिपाठी, सिताराम काकडे, अल्ताफ शेख, विशाल वालकर, निलेश मालपाणी, सुनील सोनवणे, सुनील क्षेत्रे, नलिनी गायकवाड, कांता बोठे, प्रियंका दिवटे आदींसह विविध सामाजिक संस्था, शाळा, कॉलेजातील विद्यार्थी, स्वयंसेवक, महिला मंडळे तसेच शहरातील नागरिक सहभागी झाले होते.

माळीवाडयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या अभियानाची सांगता झाली . यावेळी शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. खा. लंके म्हणाले, स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी आवश्यक राही तर ती सामाजिक एकतेचे प्रतिक आहे. दसऱ्याच्या या पवित्र दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन महापुरूषांना अभिवादन केले आणि स्वच्छ भारत, एक भारत हा संकल्प केला. सफाई कर्मचारी हे खरे समाजातील आरोग्य दूत असल्याचे का. लंके यांनी सांगितले ‌

विकासासाठी नगर शहरात शांततेची गरज

नगर शहरात मागील काही काळात जातीय तणावाच्या घटना घडत आहेत ही चिंतेची बाब आहे. शहरातील बाजारपेठेत आधीच मरगळ आलेली आहे.‌कर संकलन कमी झाले आहे. सतत तणाव निर्माण होत असल्याने बाजारपेठेवर, अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे. शहराचा विकास हवा तर एकता, अहिंसा व शांततेचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. यासाठी सर्वांनी जबाबदारीनं प्रयत्न केले पाहिजेत असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles