अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; गोवंश कत्तल प्रकरणातील 6 टोळ्या हद्दपार

नगर: गोवंशीय जनावरांची हत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाने गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. साधारण वर्षभरात जिल्ह्यातील सुमारे सहा टोळ्या हद्दपार करण्यात आल्या आहेत. त्यात 30 गुन्हेगारांचा समावेश आहे.गोवंशीय जनावरांची हत्या आणि वाहतुकीस प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. मात्र, हद्दपारीसाठी कारवाई अत्यंत तुरळक प्रमाणात होत होती. गोवंशीय जनावरांची कत्तल आणि वाहतूक करणाऱ्यांवर गुन्ह दाखल करून जनावरांची सुटका केली जात होती. तरीही गोवंशी जनावरांची कत्तल थांबत नव्हती. त्यामुळे अनेक वेळा जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आणि वाहतूक करणाऱ्यांवर हद्दपारीसाठी कारवाईचे कठोर पाऊल उचलले.

जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. यामध्ये काही विशिष्ट टोळ्या सक्रिय असून त्या रात्रीच्या सुमारास जनावरांची चोरी करणे आणि त्यांची निर्घृण कत्तल करणे असे प्रकार करत होत्या. या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केले होते. त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आणि वाहतूक करणाऱ्या सहा टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्या आहेत. त्यात नेवासा, एमआयडीसी, लोणी, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळ्यांचा समावेश आहे.

संबंधित गुन्हेगारांविरोधात जनावरांची चोरी, अवैधरित्या जनावरांची वाहतूक, जनावरांना क्रूतेने वागविणे, अवैध कत्तलखाना चालवणे, जनावरांची कत्तल करणे आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणणे अशा गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोवंश कत्तलीच्या घटनांमुळे जिल्ह्यात अनेकदा जातीय सलोखा बिघडण्याचे किंवा तणाव निर्माण होण्याचे प्रकार घडले होते.

आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाने कठोर भूमिका घेतली आहे. आणखी काही टोळ्यांची जंत्री जमविण्याचे काम सुरू असून, येत्या काही दिवसांत त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत अवैध कत्तलखाने चालू दिले जाणार नाहीत. जे लोक वारंवार कायद्याचे उल्लंघन करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर ‌’मोक्का‌’ किंवा ‌’हद्दपारी‌’ सारखी कडक कारवाई यापुढेही सुरूच राहील.

सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles