सर्वसामान्यांचेे कैवारी…माजी मंत्री आ.शिवाजीराव कर्डिले
बुऱ्हाणनगर येथे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माजी मंत्री आ.शिवाजीराव कर्डिले यांचे अचानक झालेले निधन माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला धक्का देणारे आहे. आपल्या परिवाराचा आधारवड हरपला अशीच भावना मनात आहे. सामान्य दूधवाला ते सहा वेळा आमदार, राज्यात मंत्रीपद, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अशी कर्डिले साहेबांची राजकीय, सामाजिक वाटचाल थक्क करणारी आहे. हे घडले केवळ त्यांची सर्वसामान्याप्रंती असलेली बांधिलकी, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी अहोरात्र संघर्ष करण्याची तयारी यामुळे.
माझा व कर्डिले साहेबांचा पहिला परिचय 1995 मध्ये झाला. मी स्वत: नगर तालुक्यातील वाकोडी दरेवाडी गावातील कष्टकरी कुटुंबातून पुढे आलो. माझे वडिल नगरला आडते बाजारात हमाली काम करायचे. मी स्वत: शालेय शिक्षण धेत असताना दाळमंडईत पाणपोईवर काम करून लोकांना पाणी द्यायचो. दहावीं नंतर मी बिगारी, गवडी काम केले. पुढे ठेकेदारी व्यवसाय उभा केला. नंतर ग्रामपंचायंतीला पॅनल उभे केले. आमच्या पॅनेलने सर्व 9 जागा जिंकत तत्कालिन मातब्बरांना चीतपट केले. याच काळात साहेब आमदार झालेले होते. आमचे नातेवाईक पिंपळगाव उज्जैनी येथील कान्हू वाघ यांच्या मार्फत मी साहेबांच्या संपर्कात आलो. तेव्हापासून आजतागायत मी त्यांचा कायम निष्ठावान कार्यकर्ता राहलो आहे. त्यावेळी साहेबांनी पाणी टंचाईच्या काळात जनावरांच्या चारा प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अति विशाल मोर्चा काढून प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पडले होते. या मोर्चात मी सहभागी झालो होतो. साहेबांची सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मियता मला प्रकषाने जाणवली. पुढे सन 1997 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी साहेबांनी माझी पत्नी बबईताई हरिभाऊ कर्डिले यांना चिचोंडी पाटील गटातून उमेदवारी दिली. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री, माजी खा.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जिल्हा विकास आघाडीची ही उमेदवारी होती. या निवडणुकीत आम्हाला मोठा विजय मिळाला. या निवडणुकीनंतर साहेबांनी मला, अंशाबापू शिंदे, ज्ञानदेव वारूळे, रंगनाथ निमसे यांना सपत्नीक विमानाने वैष्णोदेवी दर्शनासाठी नेले. साहेब स्वत: पत्नीसह आमच्यासोबत होते. माझ्यासारख्या कष्टकऱ्याच्या मुलाला पहिल्यांदाच प्रत्यक्ष विमानात बसण्याची संधी मिळाली. त्यावेळी आम्ही विखे पाटील साहेबांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुक्कामी होतो. हरिव्दारसह अनेक धार्मिक स्थळांना आम्ही भेटी दिल्या. साहेबांचे आपल्या सहकाऱ्यांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा मला अनुभवता आला. सन 2000 मध्ये कर्डिले साहेबांच्या पाठबळाने ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी दरेवाडी येथे ‘मळगंगा माध्यमिक विद्यालय’ सुरु करण्यात मला यश आले.
नगर तालुक्यातील दुष्काळी भागांत सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समोर ठेवून साहेबांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. पारगाव वाळूंज येथे सीना नदीवरील पूल कम बंधारा, मांडवा येथील तलाव, चिचोंडी पाटील येथील 105 कोटींची पाणी योजना, बुऱ्हाणनगर, घोसपुरी पाणी योजना अशा अनेक कामांमुळे या परिसराचा कायापालट होण्यास मदत झाली. साहेबांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाल्यावर त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी अतुलनीय योगदान दिले. दुष्काळी परिस्थिती नगर तालुक्यात गाव, वाडी तिथे छावणी उभारून शेतकऱ्यांचे पशुधन वाचवले. ‘छावणी मंत्री’ म्हणून त्यांची राज्यभरात ओळख निर्माण झाली.
सन 2012-13 या काळात पुन्हा एकदा दुष्काळाची दाहकता निर्माण झाली. या काळात साहेब स्वत: संघर्ष करीत होते, अडचणीत होते. मात्र याही परिस्थितीत त्यांनी आपल्या शेतकऱ्यांशी असलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी पाठपुरावा करून पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो, छावण्या सुरु केल्या. साहेब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन वेळा अध्यक्ष झाले. त्यांनी कायम जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिला, शेतकऱ्यांना आधार दिला. नगर तालुक्यातील महिला बचत गटांना त्यांनी बँकेमार्फत भरीव मदत केली. कोविड काळात सर्व अर्थकारण ठप्प झाले असताना साहेबांनी तालुक्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांना बँकेमार्फत खेळते भांडवल देवून आधार देण्याचे काम केले.
माझ्यासाठी साहेब कायम दैवत राहिले. एका कष्टकऱ्याच्या मुलाला त्यांना दोन वेळा जिल्हा परिषदेची संधी दिली. नगर तालुका बाजार समितीत संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली. सन 2012 ते 2017 अशी सलग पाच वर्षे बाजार समितीचे सभापतीपद भूषविण्याची संधीही मला साहेबांनीच दिली. त्यांचे व माझे आडनाव एकच असल्याने अनेकांना वाटायचे की साहेबांनी नातेवाईकालाच इतकी मोठी संधी दिली. लोक मला त्यांचा लहान भाऊच समजायचे. परंतु मी स्वत: खुलासा करायचो की, आमचे फक्त आडनाव सारखे आहे. आम्ही नातेवाईक नाहीत. या काळात माझ्याबाबत कुजबूज व्हायची पण साहेबांनी त्याकडे लक्ष न देता मला शेतकरी, हमाल मापाडी यांच्यासाठी काम करण्यास प्रोत्साहन दिले.
साहेबांचा सकाळी सात वाजता सुरू होणारा जनता दरबार म्हणजे सर्वसामान्यांसाठी मोठा आधार होता. येथे बसून ते गोरगरीबांना न्याय द्यायचे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांची सामान्यांप्रती असलेली तळमळ, प्रश्न सोडविण्याची हातोटी, कुठल्याही प्रसंगात न डगमगता धीराने त्याला तोंड देत प्रतिकूल परिस्थिती मात करणे त्यांकडून शिकायला मिळाले. कायम लोकांमध्ये रमणारा त्यांचा स्वभाव होता. कोणीही काम घेवून आल्यावर शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करायचे. आम्हालाही त्यांनी हिच शिकवण दिली. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तसेच व्यावसायिक जीवनातही साहेबांची शिकवण मला कायम प्रेरणा देणारी ठरली. मी गवंडी, बिगारी काम केले. पुढे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक अशी प्रगती केली. यात कर्डिले साहेबांच्या पाठबळाचा सिंहाचा वाटा आहे. असे हे सर्वसामान्यांचे कैवारी असलेले साहेब आम्हाला पोरकं करून गेले. त्यांच्या स्मृती आणि शिकवण मात्र मनावर कायम कोरली गेलेली आहे. साहेबांना नगर तालुक्यातील तमाम जनतेच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली….
– हरिभाऊ कर्डिले
माजी सभापती,
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती


