अहिल्यानगरमध्ये स्वच्छतेचा नवा अध्याय – सलग ६५ आठवडे यशस्वी स्वच्छता मोहीम
अहिल्यानगर : शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारी स्वच्छता मोहीम शनिवार, २२ मार्च रोजी चांदणी चौक ते कोठी चौक या परिसरात यशस्वीरीत्या पार पडली.
स्वच्छता विशेष मोहिमेअंतर्गत जेसीबी,ट्रॅक्टर,जेटिंग मशीन सहाय्याने दुभाजका जवळील माती, प्लॅस्टिक कचरा तसेच गटारींमध्ये साचलेला कचरा पूर्णपणे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक, तसेच व्यापारी संघटनांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
आयुक्तांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मोहीम सतत ६५ आठवड्यांपासून सुरू :- महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम आजपर्यंत सलग ६५ आठवडे सातत्याने राबविली जात आहे. दर शनिवारी शहरातील विविध भागांमध्ये ही मोहीम हाती घेतली जाते, ज्यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहण्यास मदत होत आहे.
पर्यावरणपूरक आणि शाश्वत स्वच्छतेचा संकल्प :- या मोहिमेद्वारे फक्त कचरा उचलण्याचे कार्यच नव्हे, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे. प्लास्टिकचा कमी वापर, कचऱ्याचे योग्य विलगीकरण, आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या महत्वाविषयी जनजागृती करण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांना आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांच्या वतीने करण्यात आले.
महानगरपालिकेचे विशेष आभार :- महानगरपालिकेच्या वतीने या मोहिमेत सहभाग घेतलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे, सामाजिक संस्थांचे, व्यापारी वर्गाचे आणि नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.


