अहिल्यानगर-कांद्याची खरेदी करून पैसे न देता सावेडी येथील एका तरूण व्यापार्याची तब्बल 13 लाख 32 हजार 342 रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 4 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल रामदास आंधळे (वय 31, रा. पारीजात कॉर्नर, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. साक्षी ट्रेडर्सचे अमित अंकुश कापरे, त्याचा भाऊ गोरक्ष उर्फ बाबू अंकुश कापरे, मेहुणा प्रमोद गोकुळ जगताप (रा. नागरे, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 14 मार्च 2020 ते 21 मार्च 2020 दरम्यान, अहिल्यानगर येथील नेप्ती मार्केट या ठिकाणी वेळोवेळी कांद्याच्या खरेदीसाठी संशयित आरोपींनी फिर्यादीकडून ट्रान्सपोर्टव्दारे माल घेतला. त्यानंतर, फिर्यादीचा व त्यांच्या वडिलांचा विश्वास संपादन करून संशयित आरोपींनी मालाची रक्कम न देता एकूण 13 लाख 32 हजार 342 रूपयांची फसवणूक केली.दरम्यान, सदर प्रकरणी सुरूवातीला आंधळे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी चौकशी करून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात परवानगी मिळाल्यानंतर सोमवार, 4 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रवींद्र डावखर करीत आहेत.
- Advertisement -


