Friday, February 20, 2026

सिंथेटिक ट्रॅक, क्रिकेट खेळपट्टी, दर्जेदार लॉन….वाडिया पार्कचे रूपडं पालटणार

नगर – शहरातील ऐतिहासिक वाडियापार्क मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी व अत्याधुनिक सोयीसुविधांसाठी राज्यातील महायुती शासनाने तब्बल ५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून त्यास यश आले असून मजूर निधीचा १५ कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला आहे. या निधीतून वाडियापार्क येथे होणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवार दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, वाडियापार्क मैदानाच्या विकासामुळे नगरच्या खेळाडूंना सरावासाठी व स्पर्धांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. अत्याधुनिक धावपट्टी, प्रकाशयोजना, प्रेक्षक गॅलरी, खेळाडूंसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छतागृहे व इतर पूरक सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यास चालना मिळेल. नगरच्या सर्व खेळाडूंचे स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावर असून, वाडियापार्क लवकरच आधुनिक क्रीडा संकुलाच्या रूपात उभे राहणार आहे. ही बाब शहरासाठी अभिमानाची व सर्वांसाठी आनंदाची वार्ता असल्याचे आ. जगताप यांनी नमूद केले.

आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून वाडिया पार्क येथे होणाऱ्या जागतिक दर्जाच्या कामांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. जागतिक दर्जाचा ट्रॅक, मान्यताप्राप्त १५ मिमी जाडीचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक ८ लेन सह उभारण्यात येणार आहे. क्रिकेट मैदानासाठी अत्याधुनिक खेळपट्टी, फ्रेश गार्डन सॉइल आणि फार्मयार्ड मॅन्युअर वापरून दर्जेदार लॉन विकसित केले जाईल. ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम यामध्ये स्टेडियमच्या देखभालीसाठी २० एच. पी.च्या मोटारसह आधुनिक पॉपअप स्प्रिंकलर सिस्टीम बसवण्यात येईल. बॉल गेम डोम रूफ यामध्ये बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल मैदानावर स्ट्रक्चरल स्टील आणि कलर कोटेड शीट वापरून मजबूत ‘डोम रूफ’ उभारले जाईल. तसेच कबड्डीचे दोन व खो-खो च्या दोन मैदानांचे अद्ययावत बांधकाम करून त्यावरही डोम रूफची सोय केली जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles