श्रीरामपूर येथील दत्तनगरमध्ये पत्नीने पतीच्या डोक्यात लाकुड मारत गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर महिलेचा पती हा दारु पिवुन मारहाण करत तिच्यावर सतत संशय घेत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलत पतीचा खून केला. पोलिसांच्या तपासात महिलेने खून केल्याची कबुली दिली असून रश्मिता मानसकुमार शाहु असे या आरोपी महिलेचे नाव आहे.
याबाबत पोकॉ कैलास तुकाराम झिने, वय- 50 वर्षे, नेमणूक-श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, दि.24 रोजी दत्तनगरचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांनी एक व्यक्ती मृत झाला असल्याबाबत कळवले. त्यावरुन मी सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता प्रथमदर्शनी मृताच्या डोक्याला मार लागलेला व त्यातुन रक्त निघाल्याचे दिसले. तसेच त्याच्या गळयावर उजव्या बाजूला काळया रंगाचा व्रण दिसला. अधिक चौकशी केली असता सदरचे घर विजू पटाट यांचे असुन त्यांचे घरी मानसकुमार शाहु हे भाडोत्री राहत असल्याचे समजले. तेथे असलेल्या रश्मिता मानसकुमार शाहु हिच्याकडे चौकशी केली असता तिने मृत व्यक्ती हा तिचा पती असल्याचे सांगुन त्याच्या मृत्यू बाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच ती मृत व्यक्तीला हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यास नकार देत तात्काळ अंत्यविधी करण्याचा आग्रह धरत होती. त्यावर मी मृतदेह साखर कामगार हॉस्पीटल येथे घेऊन गेलो. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषीत केले. सदर घटनेबाबत पो.नि.नितीन देशमुख यांना सविस्तर माहिती कळवत याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन आ.मृ नं 10/2026 बी.एन.एस.एस कलम 194 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनंतर मृतदेहाचे प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे शवविच्छेदन करण्यात आले.
सदर व्यक्तीच्या मृत्यूबाबत त्याची पत्नी रश्मिता मानसकुमार शाहु हिचेकडे पो.नि देशमुख, सपोनि जाधव यांनी तिला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने माझा पती मानसकुमार शाहु हा दारु पिऊन मला खूप मारहाण करत असे व सतत संशय घेत असे. त्यामुळे मी त्याच्या डोक्यात आंब्याचे झाडाचे लाकुड मारुन व गळा आवळुन मारुन टाकल्याची कबुली दिली.त्यामुळे बी.एन.एस 103 (1) प्रमाणे मृताची पत्नी रश्मिता शाहू हिच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


