अहिल्यानगर-आंध्र प्रदेश राज्यातील मंगलागिरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या क्रिप्टो करन्सी फसवणुकीच्या गुन्ह्यातील प्रमुख पसार संशयित आरोपी अभिजीत संजय वाघमारे (वय 31, रा. विराज कॉलनी, अहिल्यानगर) याला तोफखाना पोलिसांच्या पथकाने स्थानिक पातळीवर शोध घेऊन अटक केली. ही कारवाई आंध्र प्रदेश राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, मंगलागिरी पोलीस ठाणे, आंध्र प्रदेश येथे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आंध्र प्रदेशच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू असून, अभिजीत वाघमारे हा या गुन्ह्यात पसार होता. या संशयित आरोपीच्या अटकेसाठी आंध्र प्रदेशमधून विशेष पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले होते. तोफखाना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांच्या पथकासोबत समन्वय साधून शोधमोहीम राबवली. संशयित आरोपी अभिजीत वाघमारे हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले व पुढील तपासासाठी आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार अंमलदार अब्दुलकादर इनामदार, सुजय हिवाळे, महेश पाखरे, शफी शेख यांच्या पथकाने केली.


