अहिल्यानगर-.शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर 20 टक्क्यांपर्यंत हमखास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरूणाची तब्बल 24 लाख 20 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित तरूणाने येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
प्रताप लिंबाजी दिवटे (वय 32, रा. आगरकर मळा, स्टेशन रस्ता, अहिल्यानगर; मूळ रा. पिंपळगाव पेठ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्रताप दिवटे खासगी नोकरी करतात. 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. संबंधित व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत माहिती देत त्यांच्या कंपनीमार्फत गुंतवणूक केल्यास 20 टक्क्यांपर्यंत नफा मिळेल, असे सांगितले. फिर्यादीस एका वेबसाईटची लिंक पाठवण्यात आली. त्या वेबसाईटवर गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळाल्याचे दाखवण्यात आले होते. तसेच फिर्यादीस लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून देण्यात आला. त्यानंतर वारंवार संपर्क साधून विशिष्ट बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.संशयित आरोपींनी दिलेल्या सूचनेनुसार फिर्यादी यांनी 3 ते 11 फेब्रुवारी 2026 दरम्यान विविध बँक खात्यांवर एकूण 24 लाख 20 हजार रूपये ऑनलाइन पध्दतीने हस्तांतरित केले. गुंतवणुकीवर परतावा मागितल्यानंतर आरोपींनी आणखी 20 टक्के रक्कम भरण्याची मागणी केली. मात्र फिर्यादी यांनी ती रक्कम भरण्यास नकार देत मूळ गुंतवणुकीतून ती वजा करून उर्वरित रक्कम परत करण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणात निधी मिश्रा, अखिल वर्मा, अदिती शर्मा व अनिल सिंग या नावाने संपर्क साधण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.


