अहिल्यानगरजिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध
१७ ऑक्टोबरपर्यंत हरकती अथवा सूचना पाठविण्याचे आवाहन*
अहिल्यानगर, – महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२चा अधिनियम क्र. ५) मधील तरतूदीनुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागातील आणि पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाबाबत प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयेतील फलकावर लावण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच स्त्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्रिया) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत आरक्षणाची प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
याबाबत हरकत किंवा सूचना असल्यास, त्या लेखी स्वरूपात दि. १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे उपजिल्हाधिकारी (महसूल), अहिल्यानगर यांनी आवाहन केले आहे. तसेच, पंचायत समिती संबंधित हरकती किंवा निवेदने असल्यास ती संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावीत.
मुदतीनंतर प्राप्त झालेली निवेदने, हरकती अथवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.


