अहिल्यानगर – शासनाच्या निधीतून केलेल्या २ रस्त्यांच्या कामांची बिले काढण्यासाठी पुण्याच्या गुणवत्ता निरीक्षकांकडून एस क्यु एम अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी शासकीय ठेकेदाराकडे ७ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागातील श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयातील अभियंता प्रकाश निवृत्ती पाचनकर (रा. लक्ष्मीनगर, मांडवगण रोड, श्रीगोंदा) यांच्यावर नगर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेले अभियंता पाचनकर हे आता बांधकाम विभागातून निवृत्त झालेले आहेत. मात्र लाच मागणीची घटना पाचनकर हे सेवेत असताना १६ एप्रिल २०२५ रोजी घडली होती. शासकीय ठेकेदार असलेल्या तक्रारदार यांनी शासनाच्या निधीतून २ रस्त्यांची कामे केली होती. या कामांचे बिल काढण्यासाठी पुण्याच्या गुणवत्ता निरीक्षकांकडून एस क्यु एम अहवाल मिळणे आवश्यक असते. प्राप्त करून घेण्यासाठी अभियंता पाचनकर यांनी तक्रारदाराकडे दोन कामांचे प्रत्येकी ३५०० असे ७ हजार रुपये लाच मागितली. याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाच्या नगर येथील कार्यालयात करण्यात आली होती. या कार्यालयातील पथकाने लाच मागणी पडताळणी केली असता त्यांनी लाच मागत, ती स्विकारण्याची तयारी दर्शविली होती.
तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील संभाषणाची ध्वनिमुद्रिका तयार करून ती नाशिक येथील एसीबी कार्यालयात सादर केली. तपासादरम्यान ध्वनिमुद्रिकेतील आवाजाची पडताळणी करण्यात आली असता, तो आवाज पाचनकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पाचनकर यांच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छाया देवरे व पथकाने ही कारवाई केली आहे.


