महायुती नगरचा कायापालट करणार? शसरात रंगली चर्चा
नगर
(सचिन कलमदाणे)
: अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे. यानिमित्ताने महानगरपालिकेतील प्रशासक राज संपुष्टात येऊन पुन्हा एकदा लोकनियुक्त मंडळ कारभार पाहणार आहे. निवडणुकीसाठी राजकीय आघाडीवर सध्या वेट अँड वाच अशी परिस्थिती असली तरी आघाडी, महायुतीची खलबत सुरू आहेत. सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकत्रित), राष्ट्रवादी काँग्रेस (एकत्रित), कॉंग्रेस स्वतंत्र लढले होते. तेव्हा राज्यात आणि केंद्रात भाजपची एकहाती सत्ता असल्याने भाजपने स्वबळावर महानगरपालिका जिंकण्यासाठी जोरदार यंत्रणा उभी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राज्यातील मंत्री, के़द्रातील मंत्यांची फोज नगरच्या मैदानात उतरली होती. तेव्हा तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका प्रचारसभेत मनपाची सत्ता मिळाल्यास नगरला ३०० कोटींचा निधी देऊ अशी घोषणा केली होती. या घोषणेची शहरात मोठी चर्चा रंगली होती. मात्र निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवले. भाजपला अवघ्या १४ जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीनंतर शिवसेना व भाजप सत्तेत एकत्र येईल असे चित्र असताना राष्ट्रवादीने शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपला पाठिंबा देत मोठी खेळी केली आणि नंतर महापालिकेतील प्रथमच भाजपचा महापौर विराजमान झाला. भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयामुळे आमदार संग्राम जगताप यांना काही काळ पक्ष नेतृत्वाची नाराजी पत्करावी लागली. पण त्यांनी निर्णयावर ठाम राहत महापालिकेवर आपले वर्चस्व निर्माण करून शिवसेनेची कोंडी केली. भाजपचा महापौर झाल्याने महापालिकेला विकास कामांसाठी भरीव निधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ३०० कोटींचे आश्वासन काही पूर्ण झाले नाही.सन २०२९ मध्ये राज्यात राजकीय उलथापालथ होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी तयार झाली आणि राज्यात भाजपला सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी बाकावर बसावे लागले. याच काळात कोविड महामारी आणि लॉकडाऊन मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले.दोन अडीच वर्षांनंतर कोविड महामारी संपली आणि तिकडे शिवसेनेत उभी फूट पडून भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करीत महाविकास आघाडीला दणका दिला. या सर्व घडामोडीत महापालिकेत सत्ता असूनही भाजपला शहरासाठी भरीव निधी मिळवता आला नाही.
दरम्यान राष्ट्रवादीतही उभी फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट भाजपला जावून मिळाला आणि राज्यातील सत्तेत सहभागी झाला. या घडामोडींचा लाभ घेत आमदार संग्राम जगताप यांनी दोन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित यांच्या माध्यमातून नगर मधील रस्ते विकासासाठी तब्बल १५० कोटींचा निधी मिळवला. या निधीतून होणाऱ्या कारणांमुळे नगर मधील अनेक प्रमुख रस्त्याचे भाग्य उजळले आहे. भाजपकडून ३०० कोटींचे आश्वासन कागदावरच राहिले परंतु आ. जगताप यांनी विशेष प्रयत्न करीत शहराच्या इतिहासात प्रथमच इतका मोठा निधी आणून दाखवला. याच कामांच्या जोरावर आ. जगताप यांनी विधानसभेला सलग तिसऱ्या विजयाची कामगिरी केली.
आता नगरमध्ये अद्याप महायुतीचे ठरले नसले तरी अजितदादांनी राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेंची शिवसेना राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे तीनही पक्षांकडे संसाधनांची कमी नाही. त्यामुळे महापालिकेत एकत्र लढले किंवा स्वतंत्र लढले तरी या तिन्ही पक्षांकडून जाहिरनाम्यात भरीव विकासाचे आणि निधीचे आश्वासन मिळेल हे स्पष्टच आहे. महायुतीतील तीनही पक्ष स्वतंत्र लढले तरी सगळेच सत्तेत आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीनंतर पुन्हा त एकत्र आले सत्ता स्थापन केली तर शहराच्या विकासासाठी बदललेल्या परिस्थितीत किमान ६०० कोटीचा निधी मिळाला पाहिजे अशीच नगरकरांची भावना आहे. तसे झाले तर शहराचा खऱ्या अर्थाने कायापालट झालेला पहायला मिळेल.
तीन शक्तिमान नेत्यांकडून अपेक्षा…
महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही शक्तिमान नेते आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना युती अथवा स्वतंत्र लढण्याचा पर्याय दिला आहे. असे असले तरी निवडणुकीनंतर एकत्र येण्याची भूमिकाही त्यांनीक वेळोवेळी मांडली आहे. त्यामुळे उद्या जनतेने तीनही पक्षांना संमिश्र कौल दिला तरी तिघेही एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. त्यामुळेच नगरला विकासकामांसाठी किमान ६०० कोटींचा निधी अपेक्षित आहे


