नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, दैठणे गुंजाळ आणि टाकळी खातगाव या परिसरातील गायींना एका अज्ञात आजाराने ग्रासले असून, गेल्या काही दिवसांत सुमारे ३० गायींचा मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष डॉ. पोपटराव पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे.
हिवरे बाजार (ता. नगर), दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) आणि टाकळी खातगाव या ५ किमी परिघातील गावांमध्ये गायींच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाचे पथक, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेटी देऊन रक्ताचे नमुने, चारा, पाणी आणि शवविच्छेदनाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र, अद्याप या आजाराचे नेमके निदान होऊ शकलेले नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
नुकसान भरपाईत वाढ: सध्या जिल्हा परिषदेकडून केवळ १० हजार रुपये मदत मिळते, जी उपचारासाठीही अपुरी आहे. एका गायीची किंमत १ ते १.५ लाख रुपये असल्याने, शासनाने किमान ७५% नुकसान भरपाई द्यावी.
आजाराचे तातडीने संशोधन: पिकांवरील तणनाशके, रासायनिक खतांचा अतिवापर आणि खाद्यातील युरिया यामुळे चारा विषबाधा होत आहे का? याची कृषी व पशुसंवर्धन विद्यापीठामार्फत तातडीने तांत्रिक चाचणी व्हावी.
विमा निकषात शिथिलता: केवळ बँक कर्ज असलेल्या जनावरांनाच विमा मिळतो, हा नियम बदलून सर्व जनावरांसाठी अल्पदरात विमा योजना सुरू करावी. तोपर्यंत दूध सोसायट्यांच्या पावत्या ग्राह्य धरून मदत द्यावी.
शासकीय आदेशाची गरज: पशुपालक पूर्णपणे दूध व्यवसायावर अवलंबून असल्याने, मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने मदतीचे आदेश द्यावेत.
“शेतकरी आधीच संकटात आहे, त्यात दुभत्या जनावरांचा असा मृत्यू होणे हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. शासनाने याकडे युद्धपातळीवर लक्ष द्यावे.”


