कधी नव्हे ते मराठवाड्यात पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातल्यानंतर आता जागोजागी पुर आल्याने शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. अनेक जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांनी ओला दुष्काळाची मागणी करीत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे कालपासून सरकारने घटनास्थळी जाऊन पाहणी दौरा सुरु केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. धाराशीव येथे अजित पवार शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता एका शेतकऱ्याने कर्जमाफीचा विषय काढताच अजित पवार त्याच्यावरच भडकले.
धाराशीव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना एका शेतकऱ्याने कर्जमाफीचा विषय काढला. त्यावेळी अजित पवार यांचा तोल सुटला. आणि अजित पवार यांनी त्या शेतकऱ्यालाच फैलावर घेतले. अजित पवार यावेळी कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहात म्हणाले याला द्यारे मुख्यमंत्री पद..आम्हाला कळतंय ना.आम्ही काय येथे गोट्या खेळायला आलोय..सकाळी ६ ला सुरु केलं भावा मी करमाळ्याला असे अजित पवार रागाने म्हणाले. जे काम करत ना..त्याची मारा आम्हालाही कळंत ना. आम्ही लाडक्या बहिणींना किती मदत केली. आज ४५ हजार कोटी वर्षाला मदत करतोय..शेतकऱ्यांची वीज माफी केली २० हजार कोटी भरतोय असेही पवार यावेळी म्हणाले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय सगळी सोंग करता येतात. पण पैशाचे सोंग करता येत नाही असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. परांडा येथे पाहणी करण्यासाठी अजित पवार आले असता हा प्रकार घडला.


