पुण्याच्या मंचरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. मंचर नगरपंचायत काबीज करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे, त्यांचा सामना हा शिंदेंच्या शिवसेनेशी आहे. आज अजित पवाराच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे वारंवार चर्चेत येणारे अजित पवार आज पुन्हा आपल्या एका प्रश्नामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलेत. अजित पवारांनी थेट महिला उमेदवाराला मंचावर लव्ह मॅरेज झालंय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवारांनी मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना लव्ह मॅरेज झालंय का? असा प्रश्न विचारला. सासर आणि माहेर एकाच गावात आहे, म्हणून हा प्रश्न विचारल्याचं स्पष्टीकरणही अजितदादांनी दिलं आहे.
मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले पुर्वीच्या मोनिका बेंड, हा तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे, मोनिकाताईंचं माहेर पण इथेच आहे आणि सासरपण इथेच आहे, बरोबर आहे ना? मग लव्ह मॅरेज आहे का काय? यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला, यावेळी पुढे अजित पवार म्हणाले, सासर माहेर जवळ असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, असंही अजित पवारांनी पुढे म्हटलं आहे.मंचरच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांना हसतमुखाने चिमटा काढला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी त्यांचं भाषण संपताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील असं म्हणाले. वेळ अजित पवारांच्या भाषणाची होती, पण अजित दादांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना बोलायला संधी द्यायला सांगितलं. पण त्यांची ओळख पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे अन आत्ता भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी ओळख करुन द्यायला लावली, मग दिलीप वळसेंनी सुरातसुर मिळवत तशी ओळख करुन दिली.


