राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करा, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आल्यानंतर आता पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पक्षातील 30 हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पाठवले आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रेही हातात घेणार का, हे पाहावे लागेल.
आदरणीय श्री प्रफुल्ल पटेल साहेब
राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
विषयः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आदरणीय सुनेत्रा अजित पवार वहिनी यांची नियुक्ती करण्याबाबत मागणी.
महोदय,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारस्तंभ, दूरदृष्टीचे नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाने पक्षावर मोठे दुःखद सावट आले आहे. या कठीण काळात पक्षाला सशक्त, संयमी आणि सर्वांना एकत्र ठेवणारे नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. आदरणीय सुनेत्रा अजित पवार वहिनी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांचा अनुभव, पक्षाशी असलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी त्या सर्वार्थाने योग्य आहेत, असा आमचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलच्या प्रदेश अध्यक्षांचा ठाम विश्वास आहे.
म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, एकमुखाने आदरणीय सुनेत्रा अजित पवार वहिनी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी नम्र पण ठाम मागणी करीत आहोत.
आपण या मागणीचा सकारात्मक विचार कराल, ही अपेक्षा.


