मुंबई : नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर आज पुन्हा एकदा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. हे राज्य पुढे जावो, छत्रपती शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमी राज्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हणत अजित पवारांनी पक्षप्रवेशावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी, गेल्या काही महिन्यांतील घडलेल्या घटनांचा अनुल्लेखाने संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्लादेखील दिला आहे. राजकीय नेत्यांबद्दलची जनतेमध्ये असलेली अनास्था खुद्द अजित पवारांच्याही तोंडी पाहायला मिळाली. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाही, त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका असे अजित पवारांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दायमा यांच्यासोबत अनेक लोक पक्षप्रवेश करत आहेत, राजेश विटेकर ही संघटना वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांच्या उपस्थित अनेक जण पक्ष प्रवेश करत आहे. केंद्रात आज स्थिर सरकार आले आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण लाडक्या बहिणींची चर्चा केली, काम करताना आपण पारदर्शकपणे भूमिका घेतली पाहिजे, त्यामुळे तसे सांगणे गरजेच असते काही वेळा लोकांना वाईट वाटते, असे म्हणत 2100 रुपयांच्या संदर्भाने अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली
अनेक लोक पक्षात येऊ पाहत आहेत, पण येणाऱ्यांची जनमानसात भूमिका चांगली पाहिजे. आधीच कोणी चुकी केली असेल आणि मग त्याचा विचार असेल की सत्ताधारी पक्षात जाऊ असे असेल तर तसं होणार नाही. उद्या पेपरात फोटो यायचा अमुक पक्ष प्रवेश झाला म्हणून. आपण भाषणात जे काही सांगू ते कृतीत आलं पाहिजे. कारण आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाहीत, त्यामुळे त्याच्या पाया पडायच्या भानगडीत पडू नका असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला आहे.


