दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर शंका व्यक्त केली. “अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात वाटत नाही. राज्यात आणि देशभरात घातपाताची चर्चा झाली. त्यातच विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली. जर ब्लॅक बॉक्समधून काहीही निष्पन्न होत नसेल, तर ‘दाल में कुछ तो काला है’ असे म्हणावे लागेल,” असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक भूमिका घेत, विजय वडेट्टीवार म्हणाले की, “कोणाला अध्यक्ष नेमावा, कोणाला काय करावं, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. आम्हाला आनंद आहे की एक महिला एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होत असतील आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.”
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट कशी दिली, याचा खुलासा सरकारने करावा. एवढा मोठा व्यवहार सामान्य व्यक्ती करूच शकत नाही. या प्रकरणामागे मोठ्या लोकांचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यांनी पुढे म्हणाले की, जो भाजपसोबत आहे तोच स्वच्छ ठरतो. कितीही मोठा घोटाळा केला तरी शिक्षा होत नाही, हे अनेक घटनांतून स्पष्ट झालं आहे.


