महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी रंगते आहे. तसंच वातावरणही तापलं आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या वाद सुरु झाल्याचं असल्याचं दिसून येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे तुम्हाला माहिती असेल. पण ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे ना? असा युक्तिवाद करत अजित पवार यांनी केला. ज्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना उत्तर दिलं आहे.
अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांची कोंडी केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी एक वक्तव्य केलं होतं की अजित पवारांना बरोबर घेतलं ही आमची चूक होती. त्यावर अजित पवार यांनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी (भाजपा) माझ्यावर केले पण मी सत्तेत आहे असं वक्तव्य केलं. ज्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी याच भ्रष्टाचाराचा उल्लेख करत अजित पवारांना उत्तर दिलं आहे.
७० हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही-बावनकुळे
“आम्ही मागची पानं चाळली तर अजितदादांना बोलता येणार नाही, असा थेट इशारा बावनकुळेंनी अजित पवारांना दिला आहे. तर ७० हजार कोटींच्या प्रकरणातील सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, असंही ते म्हणालेत. अजित पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले, ठीक आहे, हे काही अभिमानास्पद नाही. न्यायालयात सुनावणी सुरु आहे, त्याचा काय निकाल येईल, त्यावर आपण पुढं जाऊ. शेवटी केस विचाराधीन आहे, अजून निकाल लागलेला नाही. अजित दादा प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या बाबी बाहेर काढणे आणि एका महापालिकेसाठी महायुतीत मनभेद निर्माण करु नयेत. हे योग्य नाही. अजित दादा याचा विचार करतील. बोलता खूप येईल, मात्र ही ती वेळ नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, “अजितदादांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. महायुतीत मनभेद आणि मतभेद निर्माण होईल असं बोलायचं नाही. असं महायुती समन्वय बैठकीत ठरलं होतं. तरी ते असं का वागले? असं का बोलले? याची मला कल्पना नाही. पण त्यांनी असं बोलायला नको होतं. ते राज्यातील महत्वाचे नेते आहेत, मी त्यांना फार सल्ला देणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये ते बरेच वर्षे सत्तेत होते. आता आम्ही मागची पानं पलटली, चाळली तर त्यांना ही काही बोलता येणार नाही.”


